
ग्राहकांना एकाच ठिकाणी अनेक वस्तू योग्य दरात मिळण्यासाठी ‘खरेदी उत्सव’ हे प्रदर्शन दादरमधील शिवाजी पार्क येथील स्काऊट हॉलमध्ये भरले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन बी. वाय. पाध्ये पब्लिसिटीचे प्रमुख विजय पाध्ये यांच्या हस्ते झाले. हे प्रदर्शन रविवार, 16 फेब्रुवारीपर्यंत सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले आहे. महिला उद्योजक आणि तरुण उद्योजक यांना एकत्र ग्राहकपेठ मिळावी आणि महिल व तरुणांनी उद्योजक व्हावे, हा या उपक्रमाचा भाग आहे. चार दिवसांच्या या प्रदर्शनात दागिने, साडय़ा, लोणची, मसाले, ड्रेस मटेरियल, लहान मुलांचे कपडे, कुर्ती, अत्तरे, पीठे, बॅग्ज, लखनवी, खाद्यपदार्थ इत्यादी अनेक वस्तू खरेदी करता येणार आहेत. विशेष म्हणजे साने गुरुजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले गांडूळ खत पर्यावरणप्रेमींना खरेदी करता येणार आहे. उद्घाटनावेळी साने गुरुजी विद्यालय नव बालोद्यान ट्रस्टचे कार्यवाह मोहन मोहाडीकर, बेस्ट प्रवासी कल्याणकारी संघटनेचे सचिव संदीप पाटील उपस्थित होते.