>> अभिराम भडकमकर
वर्तमानात जगण्याचा क्षण आपण फार कमी वेळा पकडतो. इरफान खान, विवेक वाघ अशा अकाली एक्झिट पाहिल्यानंतर लक्षात येतं… उद्याचा विचार काय करत बसायचा? जे आहे ते आता आहे, त्याचाच सोहळा करता येतो का हे पहावं. आयुष्यामध्ये आपल्याला एक्झिट माहीत नाही, पण एक्झिटपर्यंतचा काळ आपण अत्यंत विचारपूर्वक ठरवू शकतो आणि उपभोगू शकतो.
परवा मीता वशिष्ठची लल्लनटॉपने घेतलेली मुलाखत ऐकत होतो. त्यामध्ये ती नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधील तिचा वर्गमित्र इरफान खान याच्याविषयी बोलत होती. त्याच्या सोबतच्या आठवणी, गमतीजमती ती सांगत होती. त्याच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारांच्या वेळची एक अतिशय हृद्य आठवण तिने सांगितली. जणू काही जाताना इरफान आपल्या वर्गमैत्रिणीला ‘चल, बाय, येतो’ असं म्हणून निघून गेल्याची एक भावना तिच्या मनामध्ये कशी निर्माण झाली हे ती डोळ्यांत आसू आणि ओठांत हसू आणून सांगत होती.
खरंच, मृत्यू कसा असतो ना? रंगभूमीवर आपण आपल्या वर्गमित्राच्या सोबत, आपल्या सहकाऱ्यासोबत मृत्यूचे प्रसंग रंगवत असतो. आपल्या सहकलावंताचा रंगभूमीवरला मृत्यू आपण अधिकाधिक वास्तव आणि सुंदर व्हावा याचा प्रयत्न करत असतो, पण अनेकदा दुर्दैव असं समोर येतं की, प्रत्यक्ष आयुष्यातच आपल्या बरोबरीच्या किंवा आपल्यापेक्षा लहान वयाच्या सहकलावंताचे, वर्गमित्राचे मृत्यू पाहण्याची वेळ येते आणि त्या वेळेला मात्र कसं बसायचं, उठायचं, बघायचं हे सांगणारा दिग्दर्शक आसपास नसतो. कारण ते खरं वास्तव आयुष्य असतं.
रंगभूमीवर मृत्यू दाखवू नये असं एकेकाळी म्हटलं जायचं. भास या जागतिक साहित्यामध्ये अत्यंत महत्त्वाची भर टाकणाऱ्या श्रेष्ठ नाटकाराने हे संकेत तोडले. आपल्या ‘नाट्यशास्त्रा’मध्ये अनेक संकेत सांगितलेले आहेत आणि त्याचबरोबर येणाऱ्या पुढल्या पिढीने ते मोडायला हरकत नाही, असंही म्हणून ठेवलं आहे. एकूणच आपल्याकडच्या ग्रंथांमधला हा मोकळेपणा आणि हे स्वातंत्र्य हे विलोभनीय आहे. त्यामुळे रंगभूमीवर रक्त, मृत्यू अशा पद्धतीने दाखवले जाऊ नयेत असा संकेत असलेले सर्व घटक दिसू लागले. पण हीच वेळ जेव्हा प्रत्यक्ष आयुष्यात येते तेव्हा मात्र माणूस हबकून जातो. मीताचा एपिसोड ऐकताना हीच भावना आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आली. मला इरफान सीनियर असला तरी एक मैत्री होती, पण अशा पद्धतीचे अकाली मृत्यू हे त्रास देणारे असतात.परवाच आमचा निर्माता आणि दिग्दर्शक मित्र विवेक वाघ हाही अचानकच एक्झिट करता झाला. जाताना त्याने अवयव दान केले आणि तो वेगवेगळ्या लोकांच्या रूपाने आता आपल्यामध्ये वावरतोय. पण नियती प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये काहीतरी लिहून जात असते. तिने ठरवलेलं असतं, कोणाची एन्ट्री कधी, कुणाची एक्झिट कधी आणि अशी एक्झिट ही कायमच जीवाला चटका लावून जाते. गडकरी मास्तर म्हणजे राम गणेश गडकरी सांगायचे…“दैवी आले ते सोंग साजरे केले पाहिजे.’’ त्यांनी संपूर्ण आयुष्यालाच एक सोंग असं म्हटलं होतं. जसं शेक्सपियरने “आयुष्य हे एक नाटक आहे आणि आपण त्या नाटकातल्या पात्रांसारखे आहोत. खेळणारा कोणी वेगळाच आहे’’ असं म्हणून ठेवलं होतं. गडकरी मास्तर तसंच काहीसं वेगळ्या शब्दांत सांगतात आणि “आयुष्य हे क्षणभंगुर आहे. त्यावर आपलं नियंत्रण नाही,’’ हेही सांगून जातात. आपल्याकडे तर शंकराचार्यांनी या सगळ्याला ‘माया’ असं म्हटलं आहे. नाटक, चित्रपट याला ‘मायानगरी’ किंवा ‘मायावी’ असं संबोधन आहे. या सगळ्याच्या पाठीमागे आयुष्यामधली ही अकाली एक्झिटच असावी का? आयुष्यामध्ये न सांगता येणारे चढ-उतारच यामागे असतील का? अनुराधा कपूर या आमच्या एका शिक्षिकेने आमचा एक खेळ घेतला होता. त्यात त्यांनी प्रश्न विचारला होता की, फुटबॉल मॅच आणि नाटक यात फरक काय आहे, साम्य काय आहे? आम्ही साम्य खूप सांगितलं की, तिथे ग्राऊंड असतं, इकडे स्टेज असतं. तिकडे वेगळ्या प्रकारचे वेशभूषा असते. पण या सगळ्यांमध्ये त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट नंतर सांगितली ती म्हणजे नाटकातला प्रेक्षक जे काही बघत असतो त्याच्यासाठी ते सगळं नवीन किंवा पहिल्यांदाच असतं. फुटबॉलची मॅच बघतानासुद्धा आपण क्षणोक्षणी श्वास रोखून बघत असतो. कारण पुढे काय होणार हे आपल्याला माहीत नसतं. नाटकातही प्रेक्षकाला पुढे काय होणार हे माहीत नसतं आणि ती उत्सुकता शेवटपर्यंत नाटक पाहायला लावते.
फरक एवढाच आहे की, फुटबॉल मॅचमध्ये फुटबॉल खेळणाऱ्यांनासुद्धा माहीत नसतं की, पुढे काय होणार आहे? नाटकांमधल्या पात्रांना मात्र यानंतर काय घडणार आहे, कुठला सीन आहे, आपण कुठलं वाक्य बोलायचं आहे हे सगळं ठाऊक असतं आणि हे सगळं ठाऊक असूनसुद्धा हे सगळं पहिल्यांदाच घडत आहे अशा पद्धतीने ते सादर करावं लागतं. जो ते अत्यंत खरेपणाने सादर करतो तो खेळ चांगला रंगतो. नाटकामध्ये कलावंतांना पुढे काय होणार हे माहीत असूनही अनभिज्ञता दाखवावी लागते. आयुष्यामध्ये तर आपण अनभिज्ञच असतो. मला वाटतं, ही अनभिज्ञताच आयुष्य रंगतदारही करते, असुरक्षितही करते आणि एका भीतीलाही जन्माला घालते, एका औत्सुक्यालाही जन्माला घालते आणि म्हणून नाटकामध्ये ही उत्सुकता, हे औत्सुक्य, ही असुरक्षितता, ही अनभिज्ञता हे नाटकाचं आशयद्रव्य होऊन बसतं. जन्म आणि मृत्यू या दोन बिंदूंच्या मध्ये काय आहे हे माहीत नसतानाही त्याचा सोहळा करायला शिकणं आपल्याला गीतेने एका वेगळ्या पद्धतीने शिकवलं आहे. जे आहे ते सारं कसं स्वीकारायचं यावरच तुम्ही तुमच्या आयुष्याचा सोहळा करणार की कोळसा करणार? हे अवलंबून असतं.
पण कितीही झालं तरी अशा एक्झिट्स हुरहुर लावून जातात आणि पुन्हा एकदा आयुष्याच्या अनाकलनीयतेवर आपलं लक्ष केंद्रित करतात. शेवटी ही अनाकलनीयता, हे भविष्यामधलं अंधारेपण हेच तर खरं आयुष्य असतं. दुःख एवढंच की, आयुष्यात एक्झिट करायची वेळ येते तेव्हाच आपल्याला हे कळतं. तोपर्यंत आपण भूतकाळाचा पश्चात्ताप आणि भविष्यकाळाची चिंता यामध्ये जवळजवळ सारं आयुष्य वाया घालवलेलं असतं.
वर्तमानात जगण्याचा क्षण आपण फार कमी वेळा पकडतो. अशा अकाली एक्झिट पाहिल्यानंतर लक्षात येतं, उद्याचा विचार काय करत बसायचा? जे आहे ते आता आहे, त्याचाच सोहळा करता येतो का हे पाहू या. नाटकांमध्ये एक्झिट नाटककारांनी अत्यंत विचारपूर्वक ठरवलेली असते. आयुष्यामध्ये आपल्याला एक्झिट माहीत नाही, पण एक्झिटपर्यंतचा काळ आपण अत्यंत विचारपूर्वक ठरवू शकतो आणि उपभोगू शकतो. अर्थात, हे बुद्धीला कळतं, मनाला कळतं, हेही तितकंच खरं. ते ज्याला कळलं, त्याच्या आयुष्याचं सोनं होतं.