लोकसभा निवडणुकीवर 60 हजार कोटींचा चुराडा, जगातील सर्वात महाग निवडणूक

29

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

17 व्या लोकसभा निवडणुकीमध्ये एनडीएने प्रचंड बहुमत मिळवत ऐतिहासिक कामगिरीसह सत्ता स्थापन केली. नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली, त्यांच्यासह कॅबिेनेट आणि राज्यामंत्र्यांनीही शपथ घेतली. आता मोदींच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटपही झाले आहे. याच दरम्यान सेंटर फॉर मीडिया स्टडीने (सीएमएस) दावा केला आहे की यंदाच्या निवडणुकीत सर्वात जास्त खर्च झाला आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी तब्बल 60 हजार कोटींचा चुराडा झाल्याचा दावा सीएमएस संस्थेने केला आहे. तसेच आतापर्यंत जगातील ही सर्वाधीक खर्च झाल्याची निवडणूक असल्याचा दावाही करण्यात आला आहे. 60 हजार कोटींपैकी फक्त 15 ते 20 टक्के खर्च हा निवडणूक आयोगाने केला आहे, तर उर्वरित विविध पक्षांनी केला आहे. याआधी 2014 च्या लोकसभा निवडणुकीसाठी 30 हजार कोटींचा खर्च आला होता. पाच वर्षात हा खर्च दुप्पट झाला.

सीएमएसचे अध्यक्ष एन भास्कर राव यांनी सांगितले की, निवडणुकीसाठी कोणत्या पद्धतीने खर्च करायचे याबाबत आपण शिकण्याची आवश्यकता आहे. अशा प्रकारे खर्च करणे भीतीदायक आहेय. तसेच लोकशाही मजबूत करण्यासाठी आपल्याला काही सुधारात्मक उपाययोजना करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

कशावर किती खर्च?

अहवालानुसार, प्रत्येक लोकसभा मतदारसंघावर 100 कोटींची खर्च करण्यात आला आहे. यातील 12 ते 15 हजार कोटी मतदारांवर खर्च झाले. जाहिरातीसाठी 20 ते 25 हजार कोटी रुपये खर्च झाले, तसेच 5 ते 6 हजार कोटी वाहतुकीसाठी खर्च झाले आहेत. त्याचप्रमाणे 10 ते 12 हजार कोटींचा औपचारिक खर्च आला, तर 3 ते 6 हजार कोटी अन्य कारणांसाठी खर्च झाले आहेत.

भाजप सर्वात मोठा पक्ष

दरम्यान, 17 व्या लोकसभा निवडणुकीसाठी 11 एप्रिल ते 19 मे दरम्यान सात टप्प्यात मतदान पार पडले. 23 मे रोजी झालेल्या मतमोजणीमध्ये एनडीएला 352 जागा मिळाल्या, तर एकट्या भाजपने 303 जागा मिळवत दुसऱ्यांदा बहुमत मिळवले आणि सरकार स्थापन केले.

आपली प्रतिक्रिया द्या