
अधिवेशन नागपूरमध्ये म्हणजे विदर्भात होत असल्याने विदर्भ करारानुसार अधिवेशन घेण्यात यावे, ही मागणी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केली. तीच आमची भूमिका आहे. हिवाळी अधिवेशनाचा कालावधी एका आठवड्याने वाढवण्यात यावा, ही आमची मागणी आहे, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते भास्कर जाधव म्हणाले. विदर्भासाठी या अधिवेशाचा कालावधी वाढवावा अशी मागणी काँग्रेसचे नाना पटोले यांनी केली.
विदर्भावर अन्याय होऊ नये, यासाठी नागपूरमध्ये अधिवेशन घेण्याचा करार करण्यात आला होता. मात्र, सरकार अधिवेशन गुंडाळण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी केला. 15 दिवसांचे अधिवेशन जाहीर करून फक्त 4-5 दिवसांसाठी अधिवेशन घेणे, याला काही अर्थ नाही. जनतेचे प्रश्न आम्ही मांड नये, यासाठी अधिवेशनाचा कालावधी कमी ठेवण्यात आला आहे. कोट्यवधींचा खर्च करत फक्त 5 दिवसांचे अधिवेशन घेत असाल, तर नागपूर कराराला काय अर्थ आहे, असा सवालही अंबादास दानवे यांनी केला.
अधिवशेनाचा कालावधी जास्त असावा, अशी आमचीही भावना आहे. मात्र, आचारसंहितेमुळे अधिवेशनाचा कालावधी कमी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.




























































