
पालिका कर्मचाऱयांची हजेरी आता चेहरा दाखवून नोंदवली जाणार आहे. याबाबत पालिकेच्या नायर रुग्णालयात केलेला प्रयोग यशस्वी झाला असून अडीच हजार डॉक्टर, नर्स, कर्मचारी या पद्धतीने हजेरी लावत आहेत. कोणत्याही मशीनला हात न लावता ही हजेरी लागत असल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही पद्धत फायदेशीर ठरणार आहे.
पालिका कर्मचाऱयांची हजेरी बायोमेट्रिक पद्धतीने लावण्यात येते. ही हजेरी कर्मचाऱयांच्या पगारालाही लिंक करण्यात आली आहे. मात्र मार्चमध्ये मुंबईत कोरोनाने शिरकाव केल्यानंतर स्पर्श टाळून धोका कमी करण्यासाठी कर्मचाऱयांची हजेरी मस्टरवर सही करून लावली जात आहे. मात्र आता हजेरीत सुसूत्रता आणण्यासाठी लिनक्स बेस्ड आधार व्हेरिफाइड फेसियल याचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे.
कामगार संघटनांच्या पदाधिकाऱयांची कोरोनामुळे बायोमेट्रिक पद्धतीत बोट दाबून हजेरी नोंदवणे घातक असल्याची तक्रार करून पर्यायी व्यवस्था उभी करावी, अशी सूचना केली होती. त्यानुसार आयुक्तांनी प्रमुख अभियंता यांत्रिक आणि विद्युत विभागाला आदेश देत हजेरीची नवीन प्रणाली विकसित करणार होते. त्यानुसार या विभागाने निविदा मागवून या प्रणालीचा अवलंब महापालिकेत करण्याचा निर्णय घेतला आहे.
डी विभागातही कार्यवाही सुरू
नायर रुग्णालयाच्या यशस्वी प्रयोगानंतर आता पालिकेच्या डी विभाग म्हणजेच ग्रँट रोड विभागात या मशिन्स बसवल्या जात आहेत. डी विभागात या प्रकारच्या 40 मशिन्स बसवल्या जात आहेत. डी विभागातील यशस्वी प्रयोगानंतर महापालिका मुख्यालयासह सर्व विभाग कार्यालय व इतर कार्यालयांमध्ये या मशिन्स बसवल्या जातील, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.























































