फेसबुकच्या संमतीनेच युजर्सचा डेटा चोरला, मार्क झुकेरबर्ग यांचा खोटेपणा उघड

सामना ऑनलाईन । लंडन

गेल्या वर्षी लंडन येथील पॉलिटिकल कन्सलटन्सी कंपनी केंब्रिज अॅनालिटिकाद्वारे फेसबुकचा डेटा लिक झाल्याचे समोर आले होते. यामुळे हिंदुस्थानसह अनेक देशांत खळबळ उडाली. त्यावेळी डेटा चोरीची आपल्याला माहिती नव्हती, असे सांगत फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी माफीही मागितली होती. मात्र केंब्रिज अॅनालिटिका फेसबुकच्या युजर्सच्या डेटाचा कशाप्रकारे आणि कसा वापरेल या गोष्टीवर दोन्ही कंपन्यांच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत चर्चा झाली होती, अशी धक्कादायक माहिती आता उजेडात आली आहे. यामुळे मार्क झुकेरबर्ग यांचा खोटेपणा उघड झाला आहे.

ब्रिटनमधील ऑब्झर्व्हरने दिलेल्या वृत्तानुसार, युजर्सचा डेटा चोरीसंदर्भात फेसबुकचे बोर्ड सदस्य मार्क आंद्रेसीन आणि केंब्रिज अॅनालिटिकाचे अधिकारी क्रिस्तोफर काईली यांच्यामध्ये अनेक बैठका झाल्या होत्या. या वृत्तानंतर अमेरिकी रेग्युलेटर्सने या प्रकरणाची पुन्हा चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, फेसबुक आणि केंब्रिज अॅनालिटिकाच्या अधिकाऱ्यांमध्ये 2016 मध्ये बैठक झाली होती. त्याच वेळी केंब्रिजने अमेरिकेत राष्ट्रपतीपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्पसाठी निवडणूक प्रचाराचे काम केले होते. अमेरिकेच्या निवडणुकीत डोनाल्ड यांच्या बाजूने वातावरण निर्मितीचा आरोपही या कंपनीवर आहे.

8.7 कोटी युजर्सची माहिती लिक
केंब्रिज अॅनालिटिकाद्वारे फेसबुकच्या सुमारे 8.7 कोटी युजर्सचा डेटा चोरी केल्याचा खुलासा झाला होता. फेसबुकच्या या डेटा लिकप्रकरणी चौकशी करणाऱ्या फेडरल ट्रेड कमिशनने सांगितले होते की, फेसबुकने 2011 मध्ये तयार झालेल्या सेफगार्ड युजर्स प्रायव्हसीच्या नियमांचे उल्लंघन होते. यामध्ये 5.62 लाख हिंदुस्थानींचीही माहिती चोरीला गेली होती.