
मुंबई आणि आसपासच्या प्रदेशातील खराब हवा सुधारण्यात पालिकेला अपयश आले असून पालिकेच्या या निष्क्रियतेवरून मुंबई उच्च न्यायालयाने आज प्रशासनाची खरडपट्टी काढली. इतकेच नव्हे तर मुंबईची दूषित हवा सुधारण्यात पालिका ‘निष्क्रिय’ असल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्यासह एमपीसीबीच्या सदस्य सचिवांना न्यायालयात उद्या मंगळवारी हजर राहण्याचे आदेश दिले.
हवेचा दर्जा प्रदूषणामुळे घसरला असून याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने स्युमोटो याचिका दाखल करून घेतली आहे. या याचिकेवर आज सोमवारी मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अनखड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. उच्च न्यायालयाला सांगण्यात आले की, तीन वकील आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वनसंरक्षक अनिता पाटील यांचा समावेश असलेल्या चार सदस्यीय समितीने 6 ते 13 डिसेंबरदरम्यान 36 स्थळांची पाहणी केली आहे.


























































