
उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांना बनावट औषधे विकली जात असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. टेल्मा एएम या औषधांची ‘कार्बन कॉपी’ करून ती सर्रासपणे ग्राहकांना देण्यात येत होती. लाखो रुग्णांच्या जीवाशी सुरू असलेला हा खेळ लक्षात येताच एफडीएच्या विशेष पथकाने वितरकांवर छापा घालून ९ लाख रुपयांची ही बनावट औषधे जप्त केली आहेत. मानपाडा पोलिसांनी ही कामगिरी फत्ते केले असून डोंबिवली व मुंबईतील दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान या बनावट औषधांचे धागेदोरे बिहारपर्यंत असल्याचे तपासात आढळून आले असून त्याचे उत्पादन करणाऱ्याला पकडण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.
टेल्मा एएम हे औषध उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांसाठी रामबाण समजले जाते. त्याला सर्वाधिक मागणी असते. हीच बाब लक्षात घेऊन डुप्लिकेट औषधांची निर्मिती करण्यात आली. डोंबिवली परिसरात ही औषधे विकली जात असल्याचे समजताच मानपाडा पोलिसांनी ‘श्रीराम फार्मा’चा मालक पंकज उपाध्याय व कांदिवलीमधील वितरक विवेक राय या दोघांना तत्काळ अटक केली. टेल्मा एएम असे नाव छापलेल्या बनावट गोळ्यांचा साठा ताब्यात घेतला असून रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या वितरक व विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी डोंबिवलीकरांनी केली आहे.
अन्य भागातही रॅकेट असल्याचा संशय
केवळ डोंबिवली व मुंबईत नव्हे तर परिसरातील महत्त्वाच्या शहरांमध्ये व ग्रामीण भागातदेखील बनावट औषधे विकण्यात येत असावीत, असा संशय एफडीएच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या रॅकेटची संपूर्ण पाळेमुळे शोधून काढणार असून कुणालाही सोडणार नाही, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे. दरम्यान पंकज उपाध्याय याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर विवेक राय हा पोलीस कोठडीत असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.
टेल्मा एएमच्या बनावट गोळ्या शरीरात योग्य वेळेत विरघळत नाहीत. त्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रित न राहता रुग्णांना हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.
एफडीएने मिळालेल्या गुप्त माहितीनुसार छापा टाकून संशयास्पद औषधांचा साठा जप्त केला. आरोपी पंकज उपाध्याय याला ही बनावट औषधे विवेक राय याच्याकडून पुरवली जात होती.
दोघांनी संगनमताने बनावट बिलांच्या आधारे हे रॅकेट चालवल्याचा पोलिसांचा आरोप आहे. बनावट औषधे निर्माण करणाऱ्याचा शोध घेण्यासाठी बिहारकडे पोलिसांची पथके पाठवण्यात आली आहेत.





























































