लेलो भाई, ये देवगड का आम है! बॉक्स देवगड हापूसचा, आंबा मात्र परराज्यातला!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तळेरे, स्वप्नील साळसकर

‘‘लेलो भाई, ये देवगड का आम है’’ अशी हाक मुंबई, पुणेसह विविध शहरांतील व्यापाऱ्यांकडून ग्राहकांना घातली जात आहे.  बॉक्स देवगड हापूसचा आणि त्यात भरलेला आंबा परराज्यातला असल्यामुळे अनेकांची फसवणूक झाली आहे. या मार्केटिंग ट्रिकचा फटका कोकणातील शेतकरी, बागायतदारांना बसला आहे. या फसवाफसवीमुळे उत्पन्न तुटपुंजे मिळाले असल्याचा अनुभव सिंधुदुर्गातील बागायतदार सांगत आहेत. शेतकरी ते थेट ग्राहक साखळीचा फायदा मात्र भामट्या व्यापाऱ्यांनीच उचलला आहे.

देवगडमधील काही शेतकऱ्यांनी स्वतःच्या वाहनाने पुणे, कोल्हापूर, गारगोटी, मुंबईतील ठाणे, बोरिवली, डोंबिवली भागात गर्दीच्या ठिकाणी वाहने लावून विक्री करण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी राहणाऱ्या सिंधुदुर्गवासीयांकडून सांगण्यात येत होते की तुमचा आंबा महाग आहे. आठशे रुपये डझनाचा भाव सांगितला तर बाजारपेठेतील व्यापाऱ्यांकडून आम्ही पाचशे रुपये डझनाने खरेदी केला असे सांगितले जात होते. यावेळी असे निदर्शनास आले की, परराज्यातून  आलेला आंबा देवगड हापूसच्या बॉक्समधून विक्री केली जात होता.

तिसऱ्या टप्प्यात झालेली फळधारणा टिकल्यामुळे अल्पसे आणि खात्रीशीर आंबा पीक हातात आले. देवगड तालुक्यातील वळीवंडे, शिरगाव, निमितवाडी, आंबेखोल, तोरसोळे, साळशी, चाफेड, रेंबवली, कुवळे यासह अनेक गावांतील शेतकरी, बागायतदारांना उशिरा झालेले आंब्याचे उत्पादन थोड्याफार प्रमाणात हाती लागले. मार्च महिन्यात डझनाचा भाव पंधराशे रुपये, एप्रिलमध्ये बाराशेच्या आसपास तर मे महिन्यात तो घसरून 700 ते 800 रुपये डझनवर पोहोचला. त्यात भामट्या व्यापाऱ्यांनी दगा दिल्याने शेतकरी, बागायतदार पुरता कोसळला आहे.

आंबा कॅनिंग दर घसरून 65 वरून तीसवर

अतिथंडी, अवकाळी पाऊस, गारपीट आणि तीव्र उष्णतेची लाट यामुळे अल्प उत्पादन अशा चारही बाजूनी आंबापीक धोक्यात आले. असे असताना आंबा हंगाम अंतिम टप्प्यात आलेला असताना गेले दोन दिवस झालेल्या तुरळक पावसाच्या सरींच्या कारणाने आंबा कॅनिंग दर घसरून 65 वरून 30 वर आला आहे. कॅनिंग दर सुरुवातीला दिलासादायक असल्याने शेतकरी थोडा समाधानी होता; मात्र अचानक दर घसरल्याने पुन्हा एकदा उत्पादन खर्चाचे गणित कोलमडताना दिसत असल्याचे बागायतदार निलेश गावकर यांनी सांगितले.

बागेतील आंबा थेट ग्राहकापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने पुणे, मुंबई, कोल्हापूर यांसारख्या शहरांमध्ये ऑर्डरबरोबरच प्रत्यक्ष बाजारपेठेत गाडी लावून आंबा विकण्याचा प्रयत्न केला. मात्र आमच्याच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्राहकांनी आंबा खरंच देवगडचा आहे का?, यंदा हंगामात आंबाच कुठे आहे? बाजारपेठमधून आम्ही कमी किमतीत आंबा खरेदी केल्याच्या गोष्टी ऐकवल्या. मग नेलेला माल पाचशे-सहाशे रुपये डझनाने विक्री करावा लागला.  – वैभव साळसकर, शेतकरी