झटपट श्रीमंत होण्यासाठी बनवत होता बनावट वेबसाइट, बिहारमधील तरुणाला अटक

झटपट श्रीमंत होण्यासाठी बनावट वेबसाइट बनवून फसवणूक करणाऱया तरुणाला सायबर सेल पोलिसांनी अटक केली. सोनूकुमार राजेश चौधरी असे त्याचे नाव आहे. गेल्या वर्षभरापासून तो बनावट वेबसाइट तयार करत होता.

सीएट कंपनीची बनावट वेबसाइट तयार करून डिलरशिपच्या नावाखाली 49 हजार ते लाख रुपये घेऊन फसवणूक केली जात असल्याच्या तक्रारी कंपनीकडे येत होत्या. त्या तक्रारीनंतर कंपनीने सायबर सेलकडे धाव घेतली. तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणुकीसह गुन्हा दाखल केला. पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांनी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या. सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित उतेकर, तावडे, सुरवसे, गवस आदींनी तपास सुरू केला.

फसवणूक करणाऱयाची पोलिसांनी माहिती काढली. त्यानंतर उतेकर आणि स्टाफ हे आरोपीला अटक करण्यासाठी बिहारच्या दरभंगा येथे गेले. तेथून सोनूला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी दोन मोबाईल, एक टॅब आणि हार्डडिस्क जप्त केली आहे.

150 वेबसाइटचे केले कोडिंग

सोनूने गेल्या वर्षभरात 15हून अधिक बनावट वेबसाइट तयार केल्या आहेत. त्याने 150हून अधिक वेबसाइटचे कोडिंग केले आहे. कोडिंग केलेले एक हार्ड डिस्क पोलिसांनी जप्त केले आहे. त्या हार्ड डिस्कच्या तपासणीनंतर आणखी काही माहिती समोर येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या