खोटय़ा ठशांच्या आधारे एसआरएचा फ्लॅट बळकावला

361

घरासाठी पात्र नसतानाही परदेशात राहणाऱया एका व्यक्तीच्या खोटय़ा ठशांच्या आधारे तिघांनी एसआरएचा फ्लॅट बळकावल्याचा प्रकार वांद्रय़ात उघडकीस आला आहे. या फसवणुकीची गंभीर दखल घेत हायकोर्टाने याचिकाकर्त्यांनाच खडे बोल सुनावत जाब विचारला. एवढेच नव्हे तर तिघा याचिकाकर्त्यांविरोधात पोलिसांना गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.

वांद्रे पश्चिम येथे 15 वर्षांपूर्वी राबविण्यात आलेल्या एसआरए स्किममध्ये डिसुझा कुटुंबीयांनी बनावट कागदपत्रे तयार करून सात फ्लॅट बळकावले. एसआरएच्या हायपॉवर कमिटीच्या निदर्शनास ही बाब येताच डिसुझा कुटुंबीयांची पात्रता रद्द करण्यात आली. याविरोधात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात अपील केले. याचिकाकर्त्यांनी फसवणूक केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आल्याने गेल्या सुनावणीवेळी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यावेळी याचिकाकर्त्यांनी आखाती देशात काम करणाऱया एका इसमाचे वकालतनामावरही खोटे ठसे घेतले घेतल्याचे कोर्टाला आढळून आले. प्रतिवाद्यांच्या वतीने ऍड. विनोद सांगवीकर यांनी बाजू मांडली व कोर्टाची फसवणूक केल्याचे निदर्शनास आणून दिले. न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्यासमोर पार पडलेल्या सुनावणीवेळी हायकोर्टाने या फसवणुकीची गंभीर दखल घेतली त्यावेळी डिसुझा कुटुंबीयांनी याचिका मागे घेण्याची विनंती कोर्टाला केली. हायकोर्टाने याचिकाकर्त्यांची ही मागणी फेटाळून लावत पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. याचिकाकर्त्यांना कोर्टात चार आठवडय़ांच्या आत प्रत्येकी दहा हजार रुपये भरण्याचे आदेश दिले.

आपली प्रतिक्रिया द्या