अभय कुलकर्णी
आपल्या संस्कृतीमध्ये गणपती हे आराध्य दैवत आहे. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करताना ती गणेशपूजनाने होते. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव हा तर महाराष्ट्राच्या लोकोत्सवातील एक महत्त्वाचा उत्सव आहे. आजच्या जागतिकीकरणाच्या युगात जगभरात स्थायिक झालेले मराठी जन गणेशोत्सव साजरा करत असतात, पण त्यापूर्वीपासून, अगदी प्राचीन काळापासून जपान, जावा, कंबोडिया, थायलंड, नेपाळ, चीन, अफगाणिस्तान आदी देशांमध्ये गणपतीची पूजा केली जात असे. ब्राझीलसारख्या देशामध्ये तर पाच हजार वर्षांपूर्वीच्या गणेशमूर्ती सापडल्या आहेत. या बहुतेक देशांमध्ये आजही गणेशपूजनाची परंपरा आहे.
कोणत्याही कामाची सुरुवात आपल्याकडे नेहमीच गणेशपूजनाने केली जाते. अग्रपूजेचा मान हा नेहमी श्री गणेशालाच दिला जातो. मात्र अनेक परदेशांतही गणेशपूजन केले जाते. त्यापैकी काही देशांत पूर्वापार ही प्रथा आहे; तर काही देशांत आपल्याकडून ही प्रथा घेतली गेली आहे.
सम्राट अशोकाच्या कन्येने नेपाळची सध्याची राजधानी असलेल्या काठमांडू येथे गणेश मंदिर बांधल्याचे सांगितले जाते. नेपाळमध्ये पूर्वीपासूनच गणेशपूजन केले जात होते. तिथे गणेशाला ‘सूर्यविनायक‘ या नावानेही ओळखले जाते. तिथे विघ्नविनाशक देवता म्हणून गणेशाला अग्रपूजेचा मान दिला जातो. नेपाळप्रमाणेच तिबेटमध्येही याच प्रकारे गणेशपूजन केले जाते. तेथील प्राचीन मठांमध्ये गणेशाच्या पूजनाची परंपरा आहे. नवव्या शताब्दीच्या पूर्वार्धात तिबेटमध्ये मोठय़ा प्रमाणात गणेशपूजन सुरू झाले. भूतपिशाच आणि दुष्ट शक्तींचा विनाशकर्ता म्हणून तिथे गणेशाची ओळख आहे. म्यानमारमध्येही गणेशपूजन केले जाते. तेथील बौद्ध मंदिरांतही गणेशमूर्ती आढळतात.
जावामध्ये सापडलेली गणेशमूर्ती आज लंडनच्या वस्तुसंग्रहालयात ठेवली गेली आहे. इंडोनेशियातील हिंदू लोकही गणेशाची पूजा करतात. बाली द्वीपावर राजाराणीच्या मूर्ती बनवल्यानंतर त्या मूर्तींच्या उजव्या बाजूला गणपतीची मूर्ती प्रस्थापित केली जात असे. श्रीलंकेत कोलंबोपासून सुमारे दोनशे किलोमीटरवर असलेल्या कदरगाम येथे गणेशाचे भव्य मंदिर आहे. बोर्नियोमध्ये गणेशपूजनाची परंपरा पूर्वीपासून चालत आली आहे. कंबोडिया आणि थायलंडमध्येही गणेशपूजनाची प्राचीन परंपरा आहे. कंबोडियाची प्राचीन राजधानी अंगारकोट येथे तर गणेशमूर्तींचा खजिनाच सापडला आहे. विविध प्रकारच्या रंगरूपात तिथे गणेशमूर्ती सापडल्या आहेत. ‘प्राहाकनैत’ या नावाने कंबोडियात गणेशपूजा केली जाते. चीनमध्ये गणेशाला ‘कुआन शी तिएन’ या नावाने ओळखले जाते. तिथे ‘कांतिगेन’ या नावानेही गणेशाला ओळखले जाते.
जपानमध्ये गणेशाला ‘कांतिगेन’ या नावाने ओळखले जाते. येथील मूर्तींना दोन किंवा चार हात असतात. जपानमधील कोयसान संतसुजी विहारात चार ओळीत गणेशाची चित्रे मांडण्यात आली आहेत. त्यात युग्म गणेश, षड्भुज गणेश, चतुर्भुज गणेश आणि सुवर्णगणेश ही प्रमुख चित्रे आहेत.
कालांतराने गणेशाच्या पाच रूपांचे जपानमध्ये पूजन केले जाऊ लागले. कोंगो जाई तेन हे पहिले रूप होय. यालाच छत्रविनायक असे म्हणतात. गणेशाच्या दुसऱया रूपाला कोंगो जिकीतेन किंवा माल्य विनायक असे म्हणतात. तसिरा कांतिगेन किंवा भाग्यविनायक हा तिसरा गणपती होय. गेंगो एतेन हा चौथा गणपती. यालाच धनुर्विनायक या नावानेही ओळखले जाते. जेबु कुतेन हा पाचवा गणपती म्हणजे खड्गविनायक. जपानमध्ये सर्वसामान्यपणे गणेशपूजन केले जाते. चीनच्या तून हू आग येथे सन 644 मध्ये एका पर्वतावर गणेशमूर्तींची स्थापना करण्यात आली आहे. त्याखाली चिनी भाषेत लिहिले आहे की, हा हत्तींचा राजा आहे. चीनमध्ये उभे राहून एकमेकींना आलिंगन देणाऱया दोन गणेशांची मूर्ती आढळते. म्यानमारमध्ये गणपतीला महापिनी, नेपाळमध्ये हेरंब विनायक, मंगोलियात घोटाकर आणि तिबेटमध्ये सोकापरक या नावाने ओळखले जाते. जावामध्ये गणपतीला कालांतक म्हणतात. येथील चंडिबनोन नावाच्या मंदिरात ब्रह्मा, विष्णू आणि महेशाबरोबच गणपतीची मूर्तीही आहे. इंडोनेशियात गणपतीला बोरोगणेश म्हणतात.
अफगाणिस्तानात कुशाणपूर्व काळापासून गणेशपूजेची प्रथा होती. पश्चिम इराणमधील लुरिस्तान येथे करण्यात आलेल्या उत्खननात इ. स. पू. 1200 ते 1000 या काळातील गणेशमूर्ती सापडल्या आहेत. अहुरमज्दा या नावाने इराणी लोक गणेशाची पूजा करतात. इराणमधील गणपती खड्गयोद्धा स्वरूपाचा असून तो नावाप्रमाणेच योद्धा आहे.
हिंदुस्थानपासून दूरवर असलेल्या देशांचा विचार करता ग्रीसमध्ये ओरेनस नावाच्या देवाची पूजा केली जाते. त्याचे स्वरूप बऱयाच अंशी गणेशाच्या स्वरूपाशी जुळणारे आहे. इजिप्तचा इतिहासकार हर्मिज याच्या मते ओरेनस हा सर्व देवांच्या आधी पुजला जाणारा देव आहे. तो बुद्धीचा देव असून त्याचे नाव एकहोन आहे. एकदंत या नावाशी या नावाचे साम्य आढळते. त्यामुळे हे गणेशाचेच वर्णन असावे असे मानले जाते. ब्राझीलमध्ये पाच हजार वर्षांपूर्वीच्या गणेशमूर्ती सापडल्या आहेत. मस्तक हत्तीचे आणि शरीर माणसाचे अशा प्रकारच्या देवतेचे मेसिकोतील लोक आजही पूजन करतात. बुद्धीची रोमन देवता जेनस हिलासुद्धा हत्तीचे मस्तक असते. ती गणेशाच्या समकालीन मानली जाते. तिचे पूजनही मंगळवारीच केले जाते. अठराव्या शतकातील संस्कृतचे प्रकांड पंडित विल्यम जोन्स यांनी जेनस आणि गणेश यांची तुलना करून असा निष्कर्ष काढला आहे की, गणेश आणि जेनस यांच्यात कमालीचे साम्य आढळते. गणेशाची सर्व वैशिष्टय़े जेनसमध्येही आढळतात. रोमन आणि संस्कृत शब्दांच्या उच्चारांतही साम्य आढळते. जेनस आणि गणेश हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. हनोई येथे विघ्नेश्वर असे गणपतीचे नाव असून तो कमळात बसलेला असतो. ‘गणेश- अ मोनोग्राफ ऑफ द एलिफंट फेस्ड गॉड’नुसार, जगाच्या कित्येक भागांत गणेशपूजनाची प्रथा सुरू होती आणि या मूर्तींच्या आकारांत आणि प्रकारांत विभिन्नता आढळते. प्राचीन काळात हिंदुस्थानी संस्कृती दूरवर पसरलेली होती हेच यावरून सिद्ध होते.