प्रसिद्ध गिर्यारोहक अरुण सावंत यांचा अपघाती मृत्यू

963

हरिश्चंद्रगडावर रॅपलिंग करत असताना दोर तुटून झालेल्या अपघातात प्रसिद्ध गिर्यारोहक अरुण सावंत यांचा मृत्यू झाला आहे. हरिश्चंद्र गडावर रॅपलिंग करताना शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ते बेपत्ता झाले होते. स्थानिकांच्या मदतीनं सावंत यांचा शोध घेण्यात आला. कड्याच्या दरीत पडून त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

30 जणांचा सहभाग असलेल्या एका समूहासोबत सावंत हरिश्चंद्रगडावर गेले होते. शनिवारी सायंकाळी हरिश्चंद्र गडाचा भाग असलेल्या कोकण कडा ते माकड नाळ या भागात रॅपलिंग सुरू होतं. रॅपलिंगचा पहिला टप्पा पूर्ण होत आला होता. सावंत यांच्या सोबत असलेले 29 जण रॅपलिंग करून खाली उतरले. सर्वात शेवटी असलेल्या अरुण सावंत यांनी रॅपलिंगला सुरुवात केली. मात्र, ते खाली पोहचले नाहीत. सावंत खाली पोहोचू न शकल्याने ते बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच रुग्णवाहिका आणि वनविभागाचे कर्मचारी यांनी त्वरित धाव घेतली.

हरिश्चंद्र गडाच्या पायथ्याशी असलेल्या बेलपाडा गावातून अरुण सावंत यांचा शोध सुरू करण्यात आला होता. स्थानिकांच्या मदतीने अरुण सावंत यांचा शोध घेण्यात आला. तेव्हा त्यांचा मृतदेह सापडला. कोकण कड्याची उंची सुमारे अठराशे फूट असून जिथून अरुण सावंत नाहीसे झाले ती उंची जवळपास एक हजार फुटांची आहे. गेल्या तीस ते पस्तीस वर्षांच्या त्यांच्या कारकिर्दीत अरुण सावंत यांनी सह्याद्री मधील अनेक ठिकाणं आणि अनेक वाटा उजेडात आणल्या आहेत. त्यामुळे ट्रेकिंग विश्वात त्यांचं मोठं नाव होतं. त्यांच्या अपघाती निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या