पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा शॉक लागून मृत्यू, होळीच्या दिवशीची घटना

773

शेतातील पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील देहेड या गावात घडली आहे. काशिनाथ देऊबा बावस्कर (45) असे या मृत पावलेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे.

सोमवार 10 मार्च रोजी होळी सणाच्या दिवशी काशिनाथ बावस्कर गावालगत असलेल्या आपल्या शेतातील मका पिकाला पाणी देण्यासाठी गेलेले होते. दुपारी चार वाजे दरम्यान शेतातील विहिरीवर असलेल्या विद्युत पंपाच्या स्टार्टरमध्ये काही तांत्रिक बिघाड होऊन विद्युत पंप बंद पडला. त्यामुळे बावस्कर हे झालेला तांत्रिक बिघाड दृष्ट करण्यासाठी गेले असता अचानक विद्युत प्रवाह स्टार्टरमध्ये उतरल्यामुळे त्यांना विजेचा जोराचा झटका बसून दुर्दैवी मृत्यू झाला.

दरम्यान, खूप वेळ झाला तरी पती घरी आले नाहीत त्यांच्या पत्नीने आजूबाजूच्या लोकांकडे धाव घेतली. तसेच बावस्कर फोनही उचलत नसल्याने त्यांना बोलावण्यासाठी काही नागरिक शेतामध्ये गेले असता विहिरीच्या बाजूला त्यांचा मृतदेहच नागरिकांना दिसून आला. एकीकडे गावांमध्ये होळी सण साजरा होत असताना काशिनाथ बावस्कर त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे देहेड गावात शोककळा पसरली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या