
सामना प्रतिनिधी । पाथरी
पीक कर्ज मिळत नसल्याने परभरणी जिल्ह्यातील पाथरी येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेसमोर बुधवारपासून उपोषणाला बसलेल्या एका शेतकऱ्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने बळी गेला. त्यामुळे बँक अधिकाऱयांविरोधात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. तुकाराम वैजनाथ काळे (42) असे मृत शेतकऱयाचे नाव आहे. ते पाथरीतील मरडसगाव येथील रहिवासी आहेत. पीक कर्ज मिळण्याच्या मागणीसाठी भाकपतर्फे स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेच्या शाखेसमोर आंदोलन करण्यात येत आहे. पण बँकेचे अधिकारी वारंवार आश्वासने देऊन शेतकऱ्यांना झुलवत आहेत. त्यामुळे बँकेसमोर शेतकऱयांनी उपोषण सुरू केले होते. तुकाराम वैजनाथ काळे हे त्या आंदोलनात पीक कर्ज मिळण्याच्या आशेने सहभागी झाले होते.


























































