
राज्यातील नाकर्त्या सरकारने नुकसानभरपाई न दिल्याने शेतकरी मरणाला कवटाळत आहेत. त्यातच आज शेतातील नुकसान्-ाीची धास्ती घेऊन नागरसोगा येथील बिभीषण पंढरीनाथ साळुंके या तरुण शेतकर्याने रविवारी रात्री स्वत:ला पेटवून घेतले. त्याला लातूर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असताना आज सोमवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला.
अवघी एक एकर शेती, वृद्ध आई, वडील अंध आहेत. अशातच परतीच्या पावसाने शेतीतही मोठे नुकसान झाल्याने बिभीषण पंढरीनाथ साळुंके (३३) या तरुण शेतकर्याने रविवारी रात्री स्वतःच्या घरात जाळून घेतले होते. आगीचा भडका एवढा होता की त्यांचे पूर्ण शरीर गंभीररीत्या भाजले होते. त्यामुळे त्याला लातूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र सोमवारी पहाटे साडेचारच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. बिभीषण पंढरीनाथ साळुंके याच्या पश्चात वृद्ध आई, अंध वडील, विवाहित बहीण असा परिवार आहे. त्याच्या नावे विविध कार्यकारी सोसायटीचे कर्ज, इतर खाजगी देणी असून, शेतीमध्ये काहीच उत्पन्न निघालेले नाही. आता हे कर्ज फेडायचे कसे आणि खर्च भागवायचा कसा, या चिंतेत त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.


























































