आठ दिवसांत ओला दुष्काळ जाहीर न झाल्यास शेतकरी तीव्र आंदोलन करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। कराड

पाटण तालुक्यात गेले अडीच महिने सतत मुसळधार पडत असलेल्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वर्षभर पुरेल इतकेही पीक शेतकऱ्यांच्या हाताला लागेल याची शाश्वती राहिली नाही. तसेच गुरांच्या वैरणीचाही प्रश्र्न गंभीर झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे जगणं कठिण झाले आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पाटण तालुक्यात आठ दिवसांत ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. अन्यथा पाटण तालुक्यातील शेतकरी तीव्र आंदोलन छेडतील असा इशारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर यांनी शेकोटी आंदोलनावेळी दिला.

पाटण तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी विक्रमबाबा पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी पाटण तहसील कार्यालयासमोर शेकोटी आंदोलन केले. यावेळी ते बोलत होते. विक्रमबाबा पुढे म्हणाले पाटण तालुक्यात ७ जून पासून सलग अडीच महिने मुसळधार पाऊस सुरू आहे. १५ जुलै पासून कोयना धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करावा लागला आहे. या वरून पाटण तालुक्यातील अतिवृष्टीचे स्वरूप लक्षात येते. भुईमूग, हायब्रीड, सोयाबीन, ऊस, नाचणी, मुग, तूर आदी पिकांचे पुर्णपणे नुकसान झाले आहे. तरी देखील प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहिलेले नाही. शेतात पेरणी केलेल्या बियाणासह उगवून आलेली पिके देखील कुजली आहेत. तर काही ठिकाणी वाहून गेली आहेत. या सतच्या पावसाने तालुक्यातील शेतकऱ्यांचे जगणं मुश्किल करून सोडले आहे. अजून ही पाऊस थांबण्याचे चिन्हे दिसत नाही. या बरोबर वन्य प्राणी ही पिकांचे नुकसान करत आहेत. म्हणून पाटण तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली.

आठ दिवसांत ओला दुष्काळ जाहीर झाला नाहीतर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. ओला दुष्काळाच्या मागणीसाठी पाटण तहसील कार्यालयासमोर शेकोटी आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

summary…karad farmer warn protest