कागलमध्ये मुश्रीफांचा ताफा अडवून धरले धारेवर, वादग्रस्त शक्तिपीठ महामार्गावरून शेतकरी आक्रमक

वादग्रस्त शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी दोन दिवसांपूर्वी अल्टीमेटम देऊनही सरकारकडून गांभीर्याने दखल घेतली नाही. त्यामुळे येत्या दि. 21 ऑक्टोबर रोजी होत असलेल्या राज्यव्यापी परिषदेपूर्वीच शेतकरी आक्रमक होत असल्याचे दिसून येत आहे. आचारसंहितेमुळे शेतकरी रस्त्यावर उतरणार नसल्याच्या अविर्भावात सत्ताधारी नेते वावरत आहेत. मात्र, आज कागल तालुक्यातील संतप्त शेतकऱयांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा ताफा अडवून त्यांना धारेवर धरत सत्ताधाऱयांना सूचक इशारा दिला.

कागल तालुक्यातील एकोंडी गावात आज हसन मुश्रीफ प्रचारासाठी आले असता, शक्तिपीठ महामार्गबाधित शेतकऱयांनी अचानकपणे त्यांचा ताफा अडवून रस्त्यावर ठिय्या मारला. त्यामुळे मुश्रीफ यांनी गाडीतून उतरून शिष्टाई करत शेतकऱयांशी चर्चा करत समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण, शेतकरी ऐकायला तयार नव्हते. आचारसंहितेपूर्वी शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याचा लेखी निर्णय होणे गरजेचे होते, असे शेतकऱयांनी ठणकावून सांगितले. या प्रश्नावर मुश्रीफ यांच्याकडे काहीच उत्तर नव्हते. यावेळी एकोंडी गावातील वातावरण तापले होते.

शक्तिपीठ महामार्गाविरोधात गेले आठ महिने आंदोलन सुरू आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच आमदारांनी शक्तिपीठ महामार्गातून कोल्हापूर वगळतो, असे तोंडी आश्वासन दिले आहे. पण वारंवार शब्द बदलणाऱया महायुतीच्या नेत्यांवर शक्तिपीठ महामार्गबाधित शेतकऱयांचा विश्वास राहिलेला नाही. त्यामुळेच आचारसंहिता लागण्यापूर्वीच शक्तिपीठ महामार्ग रद्द केल्याची लेखी अधिसूचना काढावी, अशी मागणी शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीने केली होती. पण महायुती सरकारने याला जुमानले नाही. शेवटच्या तीन-चार दिवसांत तर योजना व महामंडळाचे निर्णय घेऊन निर्णयांचा पाऊस पाडण्यात आला. लोकसभेत फटका बसला तरी बारा जिह्यांतील 72 मतदारसंघांत विधानसभेत फटका बसण्याची शक्यता असतानाही या सरकारने हा धोका पत्करला आहे.

त्यामुळे एकोंडीत आज सुरू झालेले मंत्र्यांना अडवण्याचे आंदोलन ही सुरुवात मानली जात आहे. यापुढे बारा जिह्यांत वेगवेगळ्या मतदारसंघांत महायुतीच्या उमेदवारांना प्रचारावेळी अडवले जाण्याची शक्यता वाढली आहे. या आंदोलनात एकोंडी गावातील शक्तिपीठ महामार्गविरोधी संघर्ष समितीचे आनंदा पाटील, साताप्पा लोंढे, संतोष पवार, विष्णू वैराट, दिनकर लोंढे, सुभान वैराट, यशवंत मर्दानी, बाळासा लोंढे, संतोष लोंढे, यशवंत सुळगावे, विष्णू सुळगावे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

आता अंगावर जायलाही शेतकरी तयार – गिरीश फोंडे

n गेल्या आठ महिन्यांत शक्तिपीठ महामार्गाविरोधातील आंदोलनात महायुती सरकारमधील तीन पक्षांच्या नेत्यांच्या 30 वेगवेगळ्या प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या आहेत. त्यांनी शक्तिपीठ महामार्ग रेटायचा ठरवलेले दिसते. म्हणूनच आचारसंहितेपूर्वी कॅबिनेटमध्ये शेकडो निर्णय घेतले; पण शक्तिपीठ महामार्ग रद्दचा निर्णय घेतला नाही. आम्ही त्यांना 48 तासांचा अल्टीमेटम दिला होता. तरीसुद्धा गेंडय़ाच्या कातडीचे सरकार कंत्राटदारांची बांधिलकी दर्शवायला शेतकऱयांना अंगावर घ्यायला तयार असेल तर शेतकरीही आता अंगावर जायला तयार आहेत. निवडणुकीत शेतकरी मतपेटीतून आपला असंतोष व्यक्त करतील, असे शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे समन्वय गिरीश फोंडे यांनी सांगितले.

शक्तिपीठ महामार्ग रेटल्यास राजीनामा देणार – हसन मुश्रीफ

n आंदोलकांची समजूत काढताना मुश्रीफ यांची चांगलीच दमछाक झाली. काही काळजी करू नका. शक्तिपीठ महामार्ग रद्द होईपर्यंत आपण गप्प बसणार नाही; झालाच तर आपण राजीनामा देऊ, अशी ग्वाही मुश्रीफ यांनी दिली.

महायुती उमेदवारांविरोधात ठराव करणार

n येत्या दि. 21 ऑक्टोबर रोजी कोल्हापुरात 12 जिह्यांतील शेतकऱयांची राज्यव्यापी निर्धार परिषद होणार आहे. यात शेतकरी महायुतीच्या उमेदवारांच्या विरोधात ठराव करणार आहेत. त्यामुळे आता शेतकरी पुन्हा दिल्ली आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवारांना सळो की पळो करून सोडतील, अशी चर्चा कागलसहित कोल्हापूर जिह्यात होऊ लागली आहे.