राज्यातील सर्व 43 लाख शेती पंप वीज ग्राहकांची बिले तपासली जाणार

राज्य सरकारने कृषिपंप वीज जोडणी धोरण 2020 व त्या अंतर्गत कृषि वीज बिल सवलत योजना जाहीर केली आहे. ही योजना राबविताना राज्यातील सर्व शेती पंप वीज ग्राहकांची थकीत वीज बिले तपासली जातील व चुकीची सर्व वीज बिले दुरुस्त करण्यात येतील.

राज्यातील सर्व प्रलंबित वीज जोडण्या त्वरीत पूर्ण करण्यात येतील. यासाठी आवश्यकतेनुसार सौर पंप व वीज जोडण्यांचे उद्दीष्ट वाढविण्यात येईल. शेतकरी ग्राहकांना दिवसा वीज देण्याची योजना 3 वर्षांत पूर्ण करण्यात येईल. असे आश्वासन उर्जामंत्री नितीन राऊत यांनी मुंबई येथे झालेल्या बैठकीत दिले.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर व खानदेश डेव्हलपमेंट असोसिएशन यांनीही शेतकरी ग्राहकांच्या मागण्यांना पाठिंबा दिला आहे. बैठकीस माजी खा. राजू शेट्टी, प्रताप होगाडे, बाबासाहेब पाटील भुयेकर, विक्रांत पाटील, रावसाहेब तांबे, मुकुंद माळी, भरत अग्रवाल, जे पी लाड, एम जी शेलार, जाविद मोमीन, समीर पाटील, पोपट मोरे, महेश खराडे, राजू शेळके, अर्जुन साळुखे, शैलेश चौगुले, संजय बेले, भागवत जाधव इ. सर्व संघटना प्रतिनिधी तसेच महावितरणचे संचालक (संचलन) सतीश चव्हाण, संचालक (देयके) गडकरी, संचालक (प्रकल्प) खंडाईत व अन्य संबंधितअधिकारी उपस्थित होते.

जाहीर केलेल्या योजनेनुसार सप्टेंबर 2020 अखेर पर्यंतची थकबाकी महावितरण कंपनीच्या वतीने निश्चित करण्यात येणार आहे. सप्टेंबर 2015 अखेरच्या थकबाकी वरील सर्व विलंब आकार व सर्व व्याज रद्द करण्यात येणार आहे. ऑक्टोबर 2015 ते सप्टेंबर 2020 या 5 वर्षांच्या कालावधीतील थकबाकीवर कंपनीने कर्ज घेतले, त्या दराने व्याज आकारणी होणार आहे. यानुसार निश्चित होणारी थकबाकी पहिल्या एका वर्षात भरल्यास 50 टक्के सवलत दिली जाणार आहे.

या योजनेचे सर्व संघटनांनी स्वागत केले. तथापि ही योजना पूर्णपणे यशस्वी होण्यासाठी दोन महत्त्वाच्या त्रुटींचे निराकरण होणे आवश्यक आहे. हे शिष्टमंडळाने उर्जामंत्री व संबंधितांच्या निदर्शनास आणून दिले आहे. राज्यातील 80 टक्केहून अधिक शेतीपंपांची वीज बिले सरासरीने दुप्पट वा अधिक झालेली आहेत.

विनामीटर शेती पंपांचा जोडभार 3 हॉ. पॉ. ऐवजी 5 हॉ. पॉ.; 5 हॉ. पॉ. ऐवजी 7.5 हॉ. पॉ.; 7.5 हॉ. पॉ. ऐवजी 10 हॉ. पॉ. याप्रमाणे वाढविण्यात आला आहे. मीटर असलेल्या व मीटर चालू असलेल्या शेती पंपांचे वीज बिल मीटर रीडींग न घेता सरासरी म्हणून 100 ते 125 युनिटस म्हणजे दुप्पट वा अधिक टाकले जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या