पंचनाम्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांची शेतकऱ्यांनी काढली ‘वरात’

अतिवृष्टीमुळे शेतपीकांची आणि जमिनीची अतोनात हानी झाली. घरांमध्ये पाणी शिरल्याने संसार वाहून गेला. शेतकऱ्यांना कधी एकदा नुकसानीचे पंचनामे होतात आणि मदत मिळते असे झाले आहे. पंचनामे करण्यासाठी अधिकाऱ्यांची फौज कमी पडत आहे. अशा परिस्थितीत शेतकरी पंचनामे करायला येणाऱ्या अधिकऱ्यांची चातकासारखी वाट पाहत आहेत. त्यातून अधिकारी आलेच तर ढोलताशांच्या गजरात वरात काढून त्यांना शेतकरी पंचनामास्थळी नेत आहेत. हे शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलनच असल्याचे बोलले जात आहे.

यवतमाळच्या बाभूळगावजवळ घारफल येथे बाभूळगाव तालुका कृषी अधिकारी कृतिका डेरे, कृषी पर्यवेक्षक गोपाल जाधव व कृषी सहाय्यक दत्ता चेडके आदींनी नुकसानीची पाहणी केली. नुकसानीची पाहणी करण्यासाठी ते येताच वाजंत्री घेऊन शेतकरी त्यांच्याजवळ पोहोचले आणि ढोल-ताशा वाजवून त्यांचे स्वागत केले. अधिकाऱ्यांना चक्क वरात काढून शेतशिवारापर्यंत नेण्यात आले.

सोयाबीनचे पीक सोंगणीला आले. कपाशी पिकेसुद्धा बोंडाने बहरली आहेत. त्यात अतिवृष्टीच्या तडाख्याने उभी पीके पिवळी पडली. इतके नुकसान होऊनही मदत मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. तो तीव्रपणे व्यक्त करण्याइतकीही ताकद दुष्काळाने हतबल झालेल्या शेतकऱ्यांमध्ये राहिलेली नाही. त्यामुळे पंचनामे करायला येणाऱ्या अधिकाऱ्यांचे वाजतगाजत स्वागत करून शेतकरी आपला संताप व्यक्त करत आहेत. फक्त पंचनामे नको शेतकऱ्यांना थेट मदत द्या, तातडीने पॅकेज जाहीर करा, अशा घोषणा यावेळी शेतकऱ्यांनी दिल्या.