ईडीने घेतली फारुख अब्दुल्ला यांची झाडाझडती

जम्मू कश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांची बुधवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अनेक तास जम्मूकश्मीर क्रिकेट असोसिएशन निधी घोटाळाप्रकरणी झाडाझडती घेतली.

हिंदुस्थानी क्रिकेट नियामक मंडळाने असोसिशनला दिलेल्या 94.06 कोटी  रुपयांच्या निधीचा अपहार केल्याचा आरोप संघटनेचे तत्कालीन अध्यक्ष फारुख यांच्या नेतृत्वाखालील कार्यकारिणीवर ठेवण्यात आला आहे. जम्मूकश्मीर क्रिकेट असोसिएशनचे तत्कालीन कोषाध्यक्ष मंझूर वजीर यांनी 2012 मध्ये संघटनेचे सरचिटणीस मोहम्मद सलीम खान आणि माजी कोषाध्यक्ष एहसान मिर्झा यांच्याविरोधात करोडोंच्या  निधीचा अपहार केल्याची तक्रार पोलिसांत केली होती. हे प्रकरण पेटल्याने अखेर 30 वर्षे जम्मू कश्मीर क्रिकेट असोसिएशनवर सत्ता गाजवणारे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांना अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

या प्रकरणी आता अंमलबजावणी संचालनालयाने मनी लौंड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत अब्दुल्ला यांची पुन्हा चौकशी सुरु केली आहे. बुधवारी नॅशनल कॉन्फरन्स नेते यांची ईडीने या निधी अपहार प्रकरणात पुन्हा काही तास चौकशी केली. अब्दुल्ला क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष असताना बोर्डाच्या अनेक कार्यकारिणी पदाधिकाऱयांनी बँकांत बोगस खाती उघडून बीसीसीआयकडून आलेल्या निधीचा गैरवापर केल्याचा आरोप तक्रारदार मंझूर वजीर यांनी केला होता.

आपली प्रतिक्रिया द्या