
जम्मू-कश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांच्यावर बुधवारी झालेल्या प्राणघातक हल्ला प्रकरणातील आरोपीने पोलिसांसमोर धक्कादायक खुलासे केले आहेत. ‘मी या क्षणाची २० वर्षांपासून वाट पाहत होतो,’ असे कोणत्याही पश्चात्तापाशिवाय या हल्लेखोराने पोलिसांना सांगितले. हा हल्ला आपल्या ‘वैयक्तिक अजेंड्यातून’ केल्याचेही त्याने मान्य केले आहे.
भर लग्नात गोळीबाराचा प्रयत्न
ही घटना जम्मूमध्ये एका लग्नसोहळ्यादरम्यान घडली. ६३ वर्षीय हल्लेखोर कमल सिंग जमवाल याने ‘झेड प्लस’ (Z+) सुरक्षा कवच असलेल्या फारुख अब्दुल्ला यांच्या अगदी जवळ जाऊन आपल्या परवानाधारक पिस्तुलातून गोळी झाडली. मात्र, सुदैवाने गोळी लक्ष्याला लागली नाही आणि तिथे उपस्थित असलेल्या नॅशनल सिक्युरिटी गार्ड (NSG) च्या कमांडोंनी त्याला तातडीने झडप घालून ताब्यात घेतले. यामुळे फारुख अब्दुल्ला बालंबाल वाचले.
‘माझे स्वतःचे मिशन होते’
पोलिसांनी जेव्हा हल्ल्याचे कारण विचारले, तेव्हा आरोपी शांतपणे म्हणाला, ‘आज मला त्याला मारण्याची संधी मिळाली होती, पण तो वाचला.’ जेव्हा त्याला पुन्हा विचारले की त्याला अब्दुल्लांना का मारायचे होते, तेव्हा त्याने उत्तर दिले, ‘माझे स्वतःचे एक मिशन होते.’
हल्ला केल्यानंतर संतप्त लोकांनी त्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. राकेश सिंग नावाच्या प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, जमवाल हा स्वतःला ‘जागरण मंच’ नावाच्या एका अज्ञात संघटनेचा अध्यक्ष म्हणवून घेतो आणि त्याच्या मालकीच्या तीन दुकानांच्या भाड्यावर तो आपला उदरनिर्वाह करतो.
ओमर अब्दुल्ला यांनी उपस्थित केले प्रश्न
Allah is kind. My father had a very close shave. The details are sketchy at the moment but what is known is that a man with a loaded pistol was able to get within point blank range & discharge a shot. It was only the close protection team that deflected the shot & ensured that… https://t.co/hYBe64Eigl
— Omar Abdullah (@OmarAbdullah) March 11, 2026
या घटनेनंतर मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ‘X’ वर पोस्ट करत ते म्हणाले, ‘अल्लाहची कृपा आहे की माझे वडील वाचले. एका व्यक्तीकडे लोडेड पिस्तूल असताना तो ‘झेड प्लस’ सुरक्षा असलेल्या माजी मुख्यमंत्र्यांच्या इतक्या जवळ कसा पोहोचू शकतो, हा मोठा प्रश्न आहे. केवळ सुरक्षा पथकाच्या सतर्कतेमुळे हा कट अयशस्वी झाला’.
ज्या लग्नात ही घटना घडली तिथे फारुख अब्दुल्ला यांच्यासोबत उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी आणि मुख्यमंत्र्यांचे सल्लागार नासिर सोगामी देखील उपस्थित होते. पोलिसांनी आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल जप्त केले असून यामागे मोठी सुरक्षा त्रुटी होती का, याचा तपास सुरू आहे.

























































