
टोल नाक्यांवरून जाणाऱ्या गाड्यांसाठी FASTag केंद्रीय परीवहन मंत्रालयाने सक्तीचे केले आहे. या स्टीकरमुळे तुमच्या खात्यातून रक्कम आपोआप कापली जाणार असून टोलवसूलीची प्रक्रिया जलदगतीने झाल्याने वाहनचालकांचा वेळ वाचेल असा दावा केला जात होता. 15 डिसेंबरपासून फास्टॅगच्या सक्तीला सुरुवात झाली असून यामुळे टोलवसुली 15 टक्क्यांनी वाढली आहे. मात्र दुसरीकडे वाहनचालकांना टोलनाक्यावर थांबण्याचा वेळही वाढला असून यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.
देशभरात असलेल्या 530 टोलनाक्यांपैकी 40 ते 45 टोलनाक्यांवर प्रचंड गर्दी झाली होती. जवळपास 488 टोलनाक्यांवरील परिस्थितीचा अभ्यास केल्यानंतर रविवारी म्हणजेच 15 डिसेंबर रोजी टोलनाक्यावर वाहनचालकांची टोलभरण्यासाठी 12 मिनिटे गेली. गेल्या वर्षी याच दिवशी हा वेळ 10.04 मिनिटे होता तर गेल्या महिन्यात 15 तारखेलाच हा वेळ 10.57 मिनिटे इतका होता.
वाहतूक कोंडी होण्याचे मुख्य कारण हेच होते की फास्टॅगसाठीच्या मार्गिकेत हा स्टीकर नसलेली वाहने पण घुसवण्यात आली होती. फास्टॅग नसलेल्या गाड्यांकडून दुप्पट टोल वसूल करण्यात येणार आहे. अनेकांची यावरून भांडणे झाल्याने टोलनाक्यावरील वाहतूककोंडीत आणखीनच भर पडली. काही टोलनाक्यांवर हा स्टीकर स्कॅनच होत नव्हता, त्यामुळे टोलवसुलीचा गोंधळ वाढला. या गोंधळामुळे स्टीकर स्कॅन झाला नाही आणि जर त्या वाहनचालकाच्या खात्यात पुरेशी रक्कम असेल तर त्या गाड्यांकडून टोल न घेता तसेच सोडून द्या असे निर्देश देण्यात आले आहेत.
वाहतूक मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 245 टोलनाक्यांवर फास्टॅग नसलेल्या वाहनांसाठी दोन्ही बाजूच्या रस्त्यांवर एक मार्गिका राखीव ठेवण्यात आली आहे. 242 टोलनाक्यांवर 25 टक्के मार्गिका हा स्टीकर नसलेल्या गाड्यांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहे. उरलेल्या जवळपास 40 टोलनाक्यावरची कोणीही कोणत्याही मार्गिकेत कशाही गाड्या घुसवल्याने परिस्थिती फारच गंभीर होती. या नव्या नियमाचा वाहनचालकांना सध्या जरी त्रास होत असला तरी वाहतूक मंत्रालय आणि अधिकारी फास्टॅगमुळे खूश आहेत. या निर्णयामुळे टोलवसुली 15 टक्क्यांनी वाढली आहे. पूर्वी दिवसाला 65 -68 कोटींची टोलद्वारे कमाई होत होती. आता ही कमाई दिवसाला 80 कोटींपर्यंत पोहोचली आहे. टोलवसुलीमधल्या अनियमितता दूर करण्यासाठी आणि पारदर्शकता आणण्यासाठी फास्टॅगची कठोरतेने अंमलबजावणी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. टोलवसुलीतून दिवसाला होणारं उत्पन्न हे येत्या काही दिवसांत आणखी वाढेल अशी आशा वाहतूक मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.

























































