पोलीस निरीक्षकावर कारवाईच्या मागणीसाठी भाजपच्या माजी नगरसेविकेचे उपोषण

हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी अपमानास्पद वागणूक देऊन अश्लील शिवीगाळ केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी भाजपच्या माजी नगरसेविका व भाजपा महिला आघाडीच्या पदाधिकारी यशोदाबाई कोरडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन दिवस उपोषण केले. भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी सोमवारी भाजपा महिला पदाधिकाऱ्यावर पोलीस अधिकारी अन्याय करुनही कारवाई होणार नसेल तर सर्वसामान्यांचे काय, असा सवाल पोलीस अधिकाऱ्यांना केला. अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांनी तीन दिवसात याप्रकरणी स्वत: चौकशी करुन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार कारवाई करण्याचे लेखी आश्वासन मंगळवारी दिल्यावर कोरडे यांनी उपोषण मागे घेतले.

हिंगोली शहरातील भाजपच्या माजी नगरसेविका यशोदा कोरडे यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले होते. या उपोषणाला बसण्यापूर्वी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, पोलीस महासंचालक, नागरी हक्क संरक्षण विभाग अशा विविध ठिकाणी पाठविलेल्या निवेदनामध्ये यशोदाबाई कोरडे यांनी हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्यावर गंभीर आरोप केले. जुलै महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात घोरबांड यांनी त्यांना अपमानीत केले. तसेच अनुसुचित जातीची महिला असल्याचे माहित असुनही शिवीगाळ केल्याचा आरोप करत घोरबांड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन देऊनही कोणतीही कार्यवाही झाली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हिंगोलीत महाजनादेश यात्रेवेळी आले होते, तेव्हा भाजपाची पदाधिकारी असूनही शहरच्या पोलीस निरीक्षकांनी प्रतिबंधात्मक नोटीस देऊन या यात्रेत सहभागी होऊ दिले नाही. तसेच निर्भया समिती सदस्या असूनही महिलांच्या प्रश्नासाठी पोलीस ठाण्यात गेल्यावर तुम्ही बाहेर जा म्हणून बाहेर काढले. आपण एन्काउंटर स्पेशालिस्ट असल्याचे सांगत घोरबांड यांनी धमकावल्याचा आरोपही कोरडे यांनी केला. भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे, माजी आमदार गजाननराव घुगे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, गणेश बांगर, कैलास काबरा यांनी उपोषणस्थळी सोमवारी सायंकाळी भेट दिली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या उपस्थितीत सोमवारी झालेली चर्चा निष्फळ ठरली. त्यानंतर मंगळवारी पुन्हा अतिरिक्त पोलीस अधीक्षक व आमदारांच्या उपस्थितीत चर्चा करण्यात आली. तीन दिवसात स्वत: चौकशी करुन वरिष्ठांना अहवाल सादर केल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार कारवाई केली जाईल, असे लेखी आश्वासन देण्यात आले. त्यानंतर कोरडे यांनी उपोषण मागे घेतले.

आपली प्रतिक्रिया द्या