सहा महिन्यांपूर्वी नोकरी गेली, पत्नीचा झाला कोरोनाने मृत्यू; धक्का बसलेल्या पतीची 2 मुलींसह आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बंगळुरुमध्ये 42 वर्षीय व्यक्तीने दोन मुलींसह आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. येथील होसुर रोडवरील आंबेडकर कॉलनीमध्ये हे कुटुंब राहात होते. आत्महत्या केलेल्या व्यक्तीची सहा महिन्यांपूर्वी नोकरी गेली होती, तसेच पत्नीचाही कोरोनामुळे मृत्यू झाला होता. यामुळे हे कुटुंब मानसिक तणावामध्ये होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश (वय – 42), किर्ती (वय – 18) आणि मोनिश (वय – 9) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. मोठी मुलगी बीएससीच्या प्रथम वर्षात शिकत होती, तर छोटी मुलगी नववीमध्ये होती. सतीश यांच्या पत्नीचे दोन महिन्यांपूर्वी कोरोनाने निधन झाले होते, तर सहा महिन्यांपूर्वी त्यांची नोकरीही गेली होती.

पोलिसांना सतीश यांच्या मृतदेहाजवळ एक सुसाईड नोटही सापडली आहे. यावर सतीश आणि त्यांच्या दोन्ही मुलींच्या सह्या होत्या. यात पत्नीचा मृत्यू आणि बेरोजगारी यामुळे ते आणि त्यांच्या दोन मुली मानसिक तणावात होते असे म्हटले आहे. या तणावातच त्यांनी आत्महत्या करण्याचा पर्याय निवडला.

असा झाला खुलासा

घटनेच्या दिवशी सतीश यांच्या वडिलांनी त्यांना फोन कॉल केला होता. मात्र त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. यानंतर त्यांनी घरी जाऊन दरवाडा ठोठावला. मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी खिडकीतून आत डोकावून पाहिले असता त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. मुलगा सतीश आणि दोन्ही नातींचा मृतदेह आत लटकत होता. यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला.

35 हजार मृत्यू

दरम्यान, कर्नाटकमध्ये आतापर्यंत 35 हजार 134 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 28 लाख 47 हजार 13 नागरिकांना कोरोना झाला असून 27 लाख 46 हजार 544 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.