पत्नी माहेरी गेल्याचा राग मुलांवर काढला, मुलांना विहिरीत ढकलून स्वत: केली आत्महत्या

प्रातिनिधिक फोटो

कौटुंबिक वादाला कंटाळून वडिलांनी आपल्या अल्पवयीन मुला-मुलीला विहिरीत ढकलले. त्यानंतर स्वत:ही विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना जोधपूर येथे घडली आहे.

जोधपूर येथील सोजत रोड ठाणे क्षेत्रात राहणारे टिकाराम बावरी यांनी अत्यंत निर्दयीपणे आपल्या 10 वर्षाचा मुलगा आणि 12 वर्षाच्या मुलीला जबरदस्तीने हाताला धरून खेचत नेऊन विहिरीत ढकलले. त्यानंतर स्वत:ही विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. सकाळच्या सुमारास ही घटना घडली.

गावकऱ्यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि विहिरीत उतरून मुलीचे प्रेत बाहेर काढले. विहिर अत्यंत पडिक अवस्थेत असल्यामुळे कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून प्रशासनाने राज्य आपत्ती निवारण दलाच्या मदतीने वडील आणि मुलाचे प्रेत बाहेर काढले.

दरम्यान, सोजत रोड येथे राहणारे टिकाराम बावरी यांचे काही महिन्यांपूर्वीच त्यांच्या पत्नीशी भांडण झाले होते. भांडणानंतर ती माहेरी निघून गेली. कौटुंबिक वादाला कंटाळून टीकाराम यांनी आपल्या दोन निरागस मुलांना विहिरीत ढकलून दिले. त्यानंतर स्वत:ही आत्महत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या