
घरगुती वादातून दारूच्या नशेत असलेल्या बापाने स्वतःच्या पाचवर्षीय मुलाची जमिनीवर आपटून हत्या केली. पत्नीलाही बेदम मारहाण करून त्याने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा येथे ही घटना घडली.
आदर्श संतोष रासकर, संतोष रासकर (रा. पिंपळगाव रोठा, ता. पारनेर) अशी मृत बाप-लेकांची नावे असून, सुजाता संतोष रासकर असे जखमी पत्नीचे नाव आहे.
संतोष रासकर हा पूर्वी मुंबई येथे चालक म्हणून काम करीत होता. काही वर्षांपूर्वी तो पिंपळगाव रोठा येथे आला. गावातच वाहनचालक म्हणून काम करीत होता. मंगळवारी दुपारी पती-पत्नीचे घरगुती कारणातून भांडण झाले. हा वाद विकोपाला जाऊन त्याने पत्नी सुजाताला मारहाण करण्यास सुरुवात केली. दारूच्या नशेतच त्याने मुलगा आदर्शला स्वयंपाकाच्या ओटय़ावर आपटल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर मारहाणीमुळे पत्नी सुजाताही निपचित पडल्या होत्या. पत्नी व मुलगा मृत झाल्याचे समजून घाबरलेल्या संतोष याने घराच्या लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली.
घटनेची माहिती समजल्यानंतर पारनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी सुजाता रासकर यांना नगर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पोलीस उपअधीक्षक अजित पाटील, पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक विजय ठाकूर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद करण्यात आली आहे.
शिक्षकांची सतर्कतेमुळे मुलगी बचावली
घरातील भांडणानंतर संतोष शाळेमध्ये शिकत असलेल्या मुलीला आणण्यासाठी शाळेत गेला होता. त्याचा रुद्रावतार पाहून शाळेतील शिक्षकांनी मुलीला त्याच्यासोबत पाठविले नाही. त्यामुळे मुलगी बालंबाल बचावली आहे.























































