
सामना ऑनलाईन । हरयाणा
प्रेमी युगुलांना जर कौटुंबिक किंवा सामाजिक विरोध होत असेल तर कित्येकदा अशी युगुलं पळून जाऊन लग्न करतात. पण, अशा जोडप्यांच्या आर्थिक सुरक्षेची खबरदारी घेतली गेली असेलच असं नाही. पण, आता अशा जोडप्यांमधील प्रेयसीसाठी बँकेत मुदत ठेव ठेवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.
पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांना मुदत ठेवीची सक्ती करण्याचे आदेश दिले आहेत. अशा प्रेमी युगुलांना प्रेयसीच्या नावे कमीत कमी ५० हजार ते तीन लाख रुपयांपर्यंतची मुदत ठेव ठेवावी लागेल. पंजाब आणि हरयाणा न्यायालयात यापूर्वी महिन्याकाठी २० ते ३० जोडपी पोलीस संरक्षणाची मागणी घेऊन येतात. अशा जोडप्यांना कुटुंबीय किंवा संबंधित समाजापासून धोका संभवत असतो. त्यामुळे आपल्याला सुरक्षा मिळावी यासाठी न्यायालयाकडेही धाव घेतात. तेव्हा अशा जोड्यांना आर्थिक संरक्षण प्रदान करण्यासाठी न्यायालयाने असे दिशानिर्देश जारी केले आहेत.
यापूर्वी न्यायालय अशा जोडप्यांच्या तक्रारींची शहानिशा करत असे आणि मगच निर्णय देत असे. पण, आता यासोबत पळून जाणाऱ्या जोडप्यातील प्रेयसीच्या नावे बँकेत मुदत ठेव ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. ही रक्कम पळून जाण्याच्या तारखेच्या एक महिन्यापर्यंत ठेवावी लागेल तसंच या मुदत ठेवीची मर्यादा कमीत कमी तीन वर्षांपर्यंत ठेवावी लागेल, असंही न्यायालयाने म्हटलं आहे.



























































