सण-उत्सवात गोडी आणणाऱ्या विविध प्रकारच्या मिठाईंनी शहरातील दुकाने सज्ज झाली आहेत. विविध प्रकारची, चविष्ट आणि आकर्षक मिठाई घेण्यासाठी नागरिकांचीदेखील दुकानांमध्ये झुंबड उडत आहे. याची दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) देखील खवा, मावा व मिठाईंच्या शुद्धतेवर करडी नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. पुठल्याही प्रकारे आरोग्यास हानीकारक ठरेल अशी मिठाई विकली जाऊ नये याकरिता एफडीएकडून आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे.
गणेशोत्सवापाठोपाठ नवरात्रोत्सव, दिवाळी सण येणार असल्याने या सणांमध्ये मिठाईंना प्रचंड मागणी असते. ही बाब लक्षात घेऊन नागरिकांना दर्जेदार, सकस आणि ताजी मिठाईच मिळावी यासाठी एफडीएने आवश्यक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. एफडीएची पथके शहरातील मिठाई विव्रेते, खवा, मावा विव्रेते, मिठाई उत्पादकांवर लक्ष ठेवणार असून कधीही अन् कुठेही जाऊन तपासणी करणार आहेत. शिवाय अन्न व्यावसायिक व मिठाई उत्पादक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच बैठक घेण्यात आली. अन्न सुरक्षा व मानके कायदा, नियमानुसार निर्गमित करण्यात आलेल्या परवाना अटींचे उल्लंघन होता कामा नये, अन्नविषबाधासारखा अनुचित प्रकार घडणार नाही. त्यासाठी काय करावे आदी बाबत मिठाई उत्पादकांना सूचना देण्यात आल्या. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना सोडणार नाही, असा इशारादेखील देण्यात आला आहे.
मिठाईच्या बॉक्सवर नमूद करा
मिठाई विक्री करताना विव्रेत्यांनी विशेष खबरदारी घ्यावी. मिठाई बॉक्सवर आवश्यक बाबींची नोंद करावी. मिठाईच्या ऊत्पादनाची तारीख तसेच मिठाई कधीपर्यंत खावी हे लेखी नमूद असावे. तसेच खवा, मावा खरेदी करताना रितसर पावती असावी, असेही एफडीए अधिकाऱ्यांनी संबंधितांना सांगितले आहे. एफडीएचे अधिकारी आर. डी. पवार, ज्ञानेश्वर महाले, अश्विनी रांजणे, नसरिन मुजावर तसेच सहआयुक्त (अन्न-मुख्यालय) उल्हास इंगवले यांनी मिठाई उत्पादकांना आवश्यक सूचना केल्या आहेत.
ताजी व सकस मिठाईची खरेदी करा
मिठाई खरेदी करताना नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, आपण घेत असलेली मिठाई ताजी व सकस आहे का याची खातरजमा करावी. कुठेही मावा अथवा खवा चांगल्या दर्जाचा वापरला जात नाही असे निदर्शनास आल्यास तत्काळ एफडीएशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले असून विक्रेत्यांनी शिळी मिठाई तसेच दुय्यम दर्जाच्या मावा व खव्यापासून बनवलेल्या मिठाईची विक्री करू नये. असे कोणी करताना आढळून आल्यास कठोर कारवाई करू, असा इशारा एफडीएचे सहआयुक्त (अन्न) महेश चौधरी यांनी दिला आहे. मिठाई खरेदी केल्यानंतर ती लवकर संपवावी असे आवाहन देखील एफडीए अधिकाऱ्यांकडून आले.