गेल्या 12 वर्षांपेक्षा अधिक काळ ठेकेदार आणि प्रशासन यांनी कोकणवासीयांचा अक्षरशः अंत पाहायचे ठरवले असून दरवर्षी पावसाळ्यात मुंबई-गोवा महामार्गाचा प्रवास खडतर बनत आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वरमधील धामणी येथे महामार्ग खचण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी धामणे येथील नदीलगत मोठी संरक्षण भिंत बांधण्याचे काम हाती घेण्यात आले. पावसाळा तोंडावर असताना हे काम हाती घेतल्याने सध्या ते अपूर्ण अवस्थेत आहे. परिणामी येथील चालू स्थितीतील रस्ता आता खचू लागला असल्याने वाहनांना धोका निर्माण झाला आहे.
संरक्षण भिंतीचे काम अपूर्ण
संरक्षक भिंतीचे काम अर्धवट स्थितीत राहिल्याने पावसामुळे रस्ता खचण्यास सुरवात झाली आहे. पावसाळ्यापूर्वी संरक्षण भिंतीचे काम जर पूर्ण होणार नव्हते, तर ते हाती का घेतले? असा सवाल वाहन चालकांनी उपस्थित केला आहे. ठेकेदार पंपनी अत्यंत बेजबाबदारपणे या ठिकाणी काम करत असून वाहन चालकांच्या सुरक्षेची कोणतीही काळजी घेतली गेलेली नाही, असे दिसते.
ठेकेदार पंपनीला डिझेलचा तुटवडा
धामणी येथील रेल्वे ओव्हर ब्रीजच्या जवळ महामार्ग धोकादायक बनला आहे. सध्या डिझेल तुटवडा असल्याने काम बंद असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱयांनी दिली. रस्ता खचल्यास महामार्गावरील वाहतूक बंद होण्याची भीती वाहन चालकांनी व्यक्त केली आहे. या ठिकाणी पर्यायी रस्ता नसल्याने महामार्ग बंद होऊन वाहतूक पूर्णतः ठप्प होण्याची भीती आहे. ज्या कारणामुळे महामार्ग ठप्प होऊ शकतो अशी स्थिती असताना ठेकेदार पंपनीकडे डिझेल नसल्याने कामाला गती मिळत नसल्याचे विधान हास्यास्पद असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते परशराम पवार यांनी दिली.