
कर्जत नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कर्जत परिवर्तन विकास आघाडीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. हा प्रतिसाद पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे काही समाजकंटकांनी परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवारांचे बॅनर फाडले आहेत. यामुळे शहरात संताप व्यक्त होत आहे.
परिवर्तन विकास आघाडीचा वाढता प्रभाव पाहून विरोधकांनी धास्ती घेतली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाच्या परिवर्तन विकास आघाडी उमेदवारांचे दहिवलीत प्रभाग क्रमांक दोनमध्ये लावण्यात आलेले प्रचाराचे होर्डिंग अज्ञातांनी रात्रीच्या अंधारात फाडून टाकले आहे. याप्रकरणी नंदकुमार लाड यांनी कर्जत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलीस अधिकारी संदीप भोसले यांनी तत्काळ अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. बॅनर फाडणे म्हणजे विरोधकांचा रडीचा डाव असल्याची खिल्ली सोशल मीडियावर सुरू आहे.





























































