
>>माधव गवाणकर
मानसिक आरोग्य हा आजकालच्या ताणतणावाच्या काळातील महत्त्वाचा विषय आहे. यादृष्टीने शास्त्र्ााrय व आधुनिक दृष्टी ठेवत केलेले विषयतज्ञाचे लेखन लक्षवेधी आणि उपयुक्त ठरते. डॉ. मिलिंद पोतदार यांचे ‘मनाच्या अंतरंगात’ हे पहिलेच पुस्तक विशेष प्रशंसनीय आहे. मनाचे आजार तसे भयावह, चिंताजनक असतात. मात्र, बहुतेक आजारांवर उपाय आहेत आणि त्यादृष्टीने ‘मनाच्या अंतरंगात’ हे पुस्तक चांगले मार्गदर्शन करते.
मनोविकारांची कारणे, त्यांची व्याप्ती व वैविध्य, या आजारांचे प्रकार, ताणतणावाचे नियोजन अशा विविध विषयांना हे पुस्तक सोप्या भाषेत स्पर्श करते. ते नुसतेच माहितीपूर्ण नसून रोचक झाले आहे. शेवटी परदुःख शीतल असतेच. मनोरुग्णाचे नातलग, मित्रमंडळी यांनाही या पुस्तकातून त्या त्या मानसिक व्याधीबद्दल अचूक माहिती मिळू शकेल. मानसिक विकारांच्या संदर्भातील अज्ञान तसेच अंधश्रद्धांमुळे मनाला आलेली दुर्बलता हे पुस्तक काही प्रमाणात दूर करू शकेल.
‘मुलगा स्वतःला मुलगी समजायला लागला. मुलीप्रमाणे राहायला लागला. अशा प्रकारची ‘पारलैंगिक’ मुलाची केस मांडताना डॉक्टर ‘संप्रेरकांच्या प्रमाणामध्ये असलेली गडबड’ सांगायला विसरत नाहीत. त्यामुळे अॅबनॉर्मल वर्तन करणाऱया पुरुषाबद्दल किंवा स्त्रीबद्दल हे पुस्तक कळत-नकळत सहानुभूती निर्माण करते. समलैंगिकता हा ‘आजार’ ठरत नाही हेसुद्धा डॉ. पोतदार यांनी ठामपणे सांगितले आहे.
दारूचे व्यसन हासुद्धा मानसिक ‘आजार’च असल्याचे सत्य विधान आपल्या समाजात महत्त्वाचे ठरते. मानसोपचाराने व्यसनमुक्ती कशी मिळवता येते याबद्दलचे विवेचन तर खूपच महत्त्वाचे आहे.
तडजोडींचा अभाव, उदासीनता (डिप्रेशन) मॅनिया अर्थात उन्माद, मनोरुग्णतेमुळे होणारे आभास, संशयविकृती, बाळंतपणानंतरचे मनोविकार, स्मृतिभ्रंश आणि एकूणच वृद्धावस्थेतील मानसिकता शारीरिक आजारांचा मनोविकारांशी असलेला संबंध इ. अनेक विषय वाचकांना नक्कीच वाचनीय वाटतील. एकप्रकारची आरोग्य जागृतीच हे पुस्तक करीत आहे.
व्यक्तिमत्त्व विकृतींबद्दल दिलेली माहितीही अचूक व सर्वसामान्यांच्या ज्ञानात भर टाकणारी आहे.
‘बालपणातील मानसिक आजार’ हा विभाग पालकांनी मुद्दाम वाचावा असा आहे. अभ्यास टाळणारी मुले, अस्थिर, चंचल विद्यार्थी, मतिमंद व गतिमंद मुलांच्या पालकांना या पुस्तकातून काहीसा दिलासा मिळेल.
असमाधानी वैवाहिक आयुष्य जगणाऱया जोडप्यांची-कुटुंबाची संख्या फार प्रचंड आहे. हे वास्तवही लेखकाने मांडले आहे. विरहाचे दुःख, अति हळवेपणा अशा नाजूक विषयांनाही लेखकाने या पुस्तकात स्पर्श केला आहे. तसेच ‘शॉक ट्रीटमेंट’सारख्या उपचारपद्धतीबद्दलचे गैरसमजही अगदी सहजपणे दूर करणारा लेखही या पुस्तकात आहे.
परीक्षा करीअर हे तर युवकांच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणारे विषयही या पुस्तकात डॉक्टरांनी समाविष्ट केले आहेत.
मृत्यूचे भयापासून मंत्रचळाबरपर्यंत (तीच तीच क्रिया निरर्थकपणे करणे) आणि तीव्र भीती (पहबिया) पासून ते मनोकायिक आजारापर्यंत अनेकविध विषयांची सुलभ, धावती ओळख डॉ. पोतदार करून देतात.
एकूणच कुटुंबातील प्रत्येक प्रौढ व्यक्तीने वाचावे, असे हे पुस्तक ‘संग्रहमूल्य’ असलेले ठरते हे नक्की!
‘मनाच्या अंतरंगात’
लेखक : डॉ. मिलिंद पोतदार
प्रकाशक : ‘मनोविकास प्रकाशन’ पुणे
मूल्य : रुपये 250/-





























































