अलिबाग पेण रस्त्यावर पळी येथे झाड कोसळले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी/ अलिबाग

अलिबाग पेण रस्त्यावर पळी गावाजवळ जुने मोठे झाड रस्त्यात पडल्याने पेण कडे जाणारी व अलिबागकडे येणारी वाहतूक बंद झाली आहे. तर पर्यायी वाहतूक चरी पेझारी मार्गावर वळविण्यात आली आहे. अलिबाग पेण रस्त्यावरील या आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. झाड हटविण्याचे काम स्थानिक ग्रामस्थ व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू आहे.

जिल्ह्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. तर अनेक ठिकाणी झाडेही कोसळली होती. पळी गावाजवळ आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास रस्त्याच्या कडेला असलेले भले मोठे झाड रस्त्याच्या मधोमध पडले, त्यामुळे दोन्हीकडे जाणारी वाहतूक बंद झाली असून अलिबाग व पेण कडे जाणारी व येणारी वाहतूक कार्लेखिंड जलपाडा ते पेझारी नाका अशी वळविण्यात आली आहे.

त्यामुळे अलिबागकडे येण्याचा व पेण कडे जाण्याचा पर्यायी मार्ग असला तरी या मार्गावर वाहतूक वाढली आहे. झाड हटविण्याचे काम सुरू असून अजून तीन चार तासानंतर या मार्गावरील वाहतूक पूर्वरत होईल असे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले आहे.