आंबोली वन परिमंडळातील महिला वनरक्षकाने उचलले टोकाचे पाऊल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आंबोली वन परिमंडळात केसरी येथे वनरक्षक म्हणून कार्यरत असलेल्या २२ वर्षीय आश्लेषा मांगले (मूळ रा. आजरा) या युवतीने माडखोल धवडकी येथील आपल्या भाड्याच्या खोलीत ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी घडली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, आश्लेषा तीन वर्षांपूर्वी सिंधुदुर्ग वन खात्यात केसरी वनरक्षक पदी सेवेत रुजू झाल्या होत्या. त्या माडखोल धवडकी येथे पूजा गोवेकर यांच्या घरात भाड्याने राहत होत्या. रविवारी त्या दिवसभर घरातच होत्या. मात्र, उशिरापर्यंत बाहेर न आल्यामुळे गोवेकर यांना संशय आला. त्यांनी दरवाजा ठोठावला मात्र आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. दरवाजा उघडून आत पाहिले असता आश्लेषा यांनी ओढणीने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.

सावंतवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षद हिंगे, पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक आणि पोलीस महेश जाधव यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक करत आहेत.