
धारणगाव शिवारात अखेर वन विभागाच्या सापळ्याला यश आले असून, मादी बिबटय़ा आणि तिचा एक बछडा पिंजऱ्यात अडकला आहे. मात्र, आणखी एक बछडा परिसरात मोकाट फिरत असल्याची माहिती समोर आल्याने ग्रामस्थांमध्ये अद्यापही धास्ती कायम आहे.
विजय कोंडाजी टिळेकर यांच्या चिकूच्या बागेत लावलेल्या पिंजऱयात मादी बिबटय़ा आणि तिचा बछडा अडकला. गेल्या महिन्याभरापासून बिबटय़ाच्या हालचालींमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. सरपंच दीपक चौधरी आणि ग्रामस्थांच्या पाठपुराव्यानंतर 2 फेब्रुवारीपासून येथे पिंजरा लावण्यात आला होता. अखेर 3 मार्च रोजी दुपारी मादी व एक बछडा सापळ्यात अडकले. या घटनेनंतर गावकऱयांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी दुसरा बछडा अद्याप सापडलेला नसल्याने धोका टळलेला नाही. ग्रामस्थांनी तत्काळ दुसरा पिंजरा लावून शोधमोहीम तीव्र करण्याची मागणी केली आहे. वन विभागाच्या कर्मचाऱयांनी दोन्ही बिबटय़ांना सुरक्षितपणे राहुरी येथे हलविले आहे.

























































