
सिएटल, दि. 7 (वृत्तसंस्था) – फिफाने अमेरिकेचा आघाडीचा खेळाडू फोलारिन बालोगन याच्यावरील एका सामन्याची बंदी ऐनवेळी उठवल्यानंतर निर्माण झालेल्या वादाला बेल्जियमने मैदानावरच जोरदार उत्तर दिले. चार्ल्स डी केटेलेअरच्या दोन गोलांच्या जोरावर बेल्जियमने अमेरिकेचा 4-1 असा धुव्वा उडवत विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. सामन्यानंतर बेल्जियमच्या खेळाडूंनी केलेल्या जल्लोषाची तुलना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रसिद्ध नृत्यशैलीशी करण्यात आली आणि त्यानंतर सोशल मीडियावर अमेरिकेची चांगलीच खिल्ली उडाली.
सामन्याच्या नवव्या मिनिटालाच डी केटेलेअरने सहज गोल करत बेल्जियमला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर अमेरिकेच्या गोलरक्षकाच्या मोठय़ा चुकीचा फायदा घेत हान्स व्हानाकेनने दुसरा गोल केला. उत्तरार्धात डी केटेलेअरने वैयक्तिक दुसरा गोल झळकावला, तर बदली खेळाडू रोमेलू लुकाकूने चौथा गोल करत अमेरिकेच्या पुनरागमनाच्या सर्व आशा संपुष्टात आणल्या. अमेरिकेला केवळ एकच गोल करता आला.
फिफाने बालोगनवरील बंदी स्थगित केल्यानंतर प्रशिक्षक मॉरिसिओ पोचेटिनो यांनी त्याला थेट अंतिम संघात स्थान दिले होते, मात्र संपूर्ण सामन्यात तो प्रभाव पाडू शकला नाही. अखेर 92 व्या मिनिटाला त्याला मैदानाबाहेर बोलावण्यात आले. या निर्णयामागे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या हस्तक्षेपाची चर्चा रंगली होती. त्यामुळे सामना सुरू होण्यापूर्वीच फिफावर आणि अमेरिकेवर टीकेची झोड उठली होती. मात्र अमेरिकेच्या दयनीय खेळानंतर सोशल मीडियावर उपरोधिक प्रतिक्रियांचा अक्षरशः पूर आला. काहींनी ‘अमेरिका प्रथमच फुटबॉल खेळत आहे का?’ असा टोला लगावला, तर काहींनी ‘गेल्या 48 तासांपेक्षाही हा पराभव अधिक लाजीरवाणा’ असल्याचे म्हटले.
सामना संपल्यानंतर बेल्जियमच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावर ‘ओव्हरटर्न धीस’ (आता हा निकालही उलथवून दाखवा!) असा उपरोधिक संदेश पोस्ट करण्यात आला. अमेरिकेने फुटबॉलला ‘सॉकर’ म्हणण्यालाही त्यांनी चिमटा काढला.
‘फिफा माफिया’च्या घोषणा
सामन्यापूर्वी लुमेन फील्डकडे जाताना बेल्जियमच्या चाहत्यांनी ‘फिफा माफिया’ अशा घोषणा देत फिफाविरोधात संताप व्यक्त केला. इराणच्या संघाला अमेरिकेचा व्हिसा, सोमालियाच्या पंचाला व्हिसा नाकारण्याचा प्रकार किंवा हैतीच्या जर्सीवरील वाद यांसारख्या घटनांमध्ये फिफाने असहायता व्यक्त केली होती, मात्र बालोगनच्या प्रकरणात भूमिकेमुळे फिफावर दुहेरी निकषाचा आरोप झाला.
‘मैदानावरच उत्तर दिले’
बेल्जियमचा कर्णधार युरी टिलेमान्स म्हणाला, ‘बालोगनबाबतचा निर्णय ऐकल्यानंतर आम्ही संघाची बैठक घेतली. मैदानावरच उत्तर द्यायचे, असे ठरवले आणि तेच आज करून दाखवले.’ मधल्या फळीतील निकोलस रास्किन म्हणाला, ‘आयुष्यात न्याय कुठेतरी मिळतोच. आम्हाला तो निर्णय योग्य वाटला नव्हता. आजचा विजय म्हणजे त्यालाच मिळालेले उत्तर आहे.’






























































