
अखेरच्या क्षणी नशिबानेही स्पेनचीच साथ दिली आणि फुटबॉलविश्वातील एका महान पर्वावर पडदा पडण्याची वेळ आली. अतिरिक्त वेळेच्या पहिल्याच मिनिटात पर्यायी खेळाडू मिकेल मेरिनोने झळकावलेल्या विजयी गोलच्या जोरावर स्पेनने कट्टर प्रतिस्पर्धी पोर्तुगालवर 1-0 अशी नाटय़मय मात करत विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. या पराभवामुळे महान फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीचाही शेवट झाल्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
कसा झाला मॅचविनिंग गोल
सामन्याच्या 91 व्या मिनिटाला मेरिनोवर झालेल्या फाऊलनंतर स्पेनला फ्री-किक मिळाली. क्षणार्धात चेंडू खेळात आणत मेरिनोनेच पुढे धाव घेतली. फेरान टोरेसच्या अचूक पासवर त्याने पोर्तुगालचा गोलरक्षक दियोगो कोस्ता याला भेदत चेंडू जाळ्यात धाडला आणि स्पेनच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
रोनाल्डोच्या पदरी निराशाच
आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक 146 गोल आणि 233 सामने खेळण्याचा विक्रम करणाऱया 41 वर्षीय रोनाल्डोसाठी हा बहुधा आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील अखेरचा विश्वचषक ठरला. अखेरची शिट्टी वाजल्यानंतर त्याच्या चेहऱयावरची निराशा एका युगाच्या समाप्तीची साक्ष देत होती. विक्रमांचे इमले रचणाऱया रोनाल्डोची फिफा वर्ल्ड कप जिंकण्याची कहाणी अधुरीच राहणार आहे.
मेरिनो ठरला ‘सुपर सब’
85 व्या मिनिटाला मैदानात उतरलेल्या मेरिनोने अवघ्या काही मिनिटांत सामन्याचा निकाल बदलला. दुखापतींमुळे त्याच्या स्पेनच्या संघातील स्थानावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते, मात्र निर्णायक क्षणी त्यानेच स्पेनचा तारणहार बनत आपल्या निवडीचे सार्थक केले. इंग्लिश क्लब आर्सेनलकडून खेळताना दाखवलेली बहुआयामी क्षमता त्याने पुन्हा एकदा सिद्ध केली.
रोनाल्डोची जादू यावेळी फिकी
2018 च्या विश्वचषकात याच स्पेनविरुद्ध रोनाल्डोने हॅटट्रिक झळकावत 3-3 अशी थरारक बरोबरी साधली होती, मात्र यावेळी स्पेनच्या अभेद्य बचावफळीने त्याला पूर्णपणे जखडून ठेवले. यंदाच्या स्पर्धेत तीन गोल करणाऱया रोनाल्डोला फारशा संधी मिळाल्याच नाहीत. पहिल्या सत्रात त्याचे दोन धोकादायक प्रयत्न गोलरक्षक उनाय सिमॉनने अप्रतिम बचाव करत परतवून लावले. त्यातील एक हवेत झेपावत दोन्ही हातांनी टिपलेला चेंडू हा सामन्याचा सर्वोत्तम बचाव ठरला.
स्पेनची अभेद्य भिंत
स्पेनने या सामन्यासह सलग सहाव्या विश्वचषक सामन्यात ‘क्लीन शीट’ राखत विश्वविक्रम प्रस्थापित केला. यापूर्वी हा विक्रम 1990 मधील इटली आणि 2006 ते 2010 दरम्यानच्या स्वित्झर्लंडच्या नावे प्रत्येकी पाच सामन्यांचा होता. स्पेनची ही मालिका 2022 च्या विश्वचषकातील मोरोक्कोविरुद्धच्या गोलशून्य सामन्यापासून सुरू झाली. यंदाच्या स्पर्धेत केप व्हर्डेविरुद्धची गोलशून्य बरोबरी आणि त्यानंतरचे सलग चार ‘क्लीन शीट’ विजय यामुळे हा नवा इतिहास घडला.
स्पेन 16 वर्षांनी उपांत्यपूर्व फेरीत
या विजयासह स्पेनने 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेत विश्वविजेते ठरल्यानंतर प्रथमच विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. आता त्यांचा सामना बेल्जियमशी होणार आहे. दुसरीकडे, सलग दुसऱयांदा विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचण्याचे पोर्तुगालचे स्वप्न भंगले.
सिमॉनने मोडला झेंगाचा विक्रम
स्पेनचा गोलरक्षक उनाय सिमॉन याने सलग 609 मिनिटे गोल न स्वीकारण्याचा विश्वविक्रम आपल्या नावावर केला. यापूर्वी इटलीचे दिग्गज गोलरक्षक वॉल्टर झेंगा यांच्या नावावर 1990 विश्वचषकातील 517 मिनिटांचा विक्रम होता. या स्पर्धेत पोर्तुगालविरुद्धच्या सामन्यापूर्वी
सिमॉनने केवळ चार बचाव केले होते. ऑस्ट्रियाविरुद्ध तर त्याच्याकडे एकही ऑन-टार्गेट फटका आला नव्हता. मात्र रोनाल्डोचे दोन अचूक फटके रोखून त्याने पुन्हा एकदा स्पेनच्या विजयात मोलाचा वाटा उचलल्याचे पाहायला मिळाले.






























































