बेल्जियमची पहिल्या स्थानावर झेप

15

सामना ऑनलाईन, कॅलिनिनग्रॅड

बेल्जियमने गुरुवारी मध्यरात्री झालेल्या फुटबॉल वर्ल्डकपमधील लढतीत इंग्लंडला १-० अशा फरकाने हरवत ‘जी’ गटात सलग तिसऱ्या विजयासह नऊ गुणांची कमाई केली आणि पहिल्या स्थानावर झेप घेतली. या पराभवामुळे इंग्लंडला सहा गुणांसह दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. आता अंतिम १६ च्या फेरीत बेल्जियमसमोर जपानचे तर इंग्लंडसमोर कोलंबियाचे आव्हान असणार आहे. उरुग्वे व क्रोएशिया यांच्यानंतर गटात तीन विजयांनंतर अव्वल स्थानावर झेप घेणारा बेल्जियम तिसराच संघ ठरला आहे हे विशेष.

अदनान जॅनुझाजने केला विजयी गोल

बेल्जियम व इंग्लंड यांच्यामधील लढतीत एकमेव गोल झाला. अदनान जॅनुझाझने ५१व्या मिनिटाला हा गोल केला. मात्र त्यानंतर दोन्ही संघांना गोल करता आला नाही. बेल्जियमने दुसरा गोल करण्याची संधी घालवली. या लढतीत दोन्ही संघांनी तोडीसतोड खेळ केला. बेल्जियमकडे ५२ टक्के फुटबॉलवरील ताबा होता. तसेच बेल्जियममधील खेळाडूंनाच दोन यलो कार्ड दाखवण्यात आले.

इंग्लंडचा प्रवास तुलनेने सोप्पा

इंग्लंडला साखळी फेरीतील अखेरच्या लढतीत हार सहन करावी लागली असली तरी यामुळे त्यांचा फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण आता अंतिम १६ च्या लढतीत त्यांना कोलंबियाचा सामना करावयाचा आहे. पण त्यापुढील उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत त्यांना स्वीडन व स्वित्झर्लंड यांच्यामधील विजेत्याला टक्कर द्यावी लागणार आहे. बेल्जियमला मात्र जपानला हरवल्यानंतर ब्राझील किंवा मेक्सिको या संघाशी दोन हात करावे लागणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या