हिंदुस्थान-बांगलादेश कोलकात्यात भिडणार, विजयाचे खाते उघडण्यासाठी यजमान सज्ज

403

आशियाई विजेत्या कतारविरुद्ध गोलशून्य बरोबरीचा पराक्रम केल्याने मनोबल उंचावलेल्या हिंदुस्थानी संघाची फिफा वर्ल्ड कप पात्रता फेरीत मंगळवारी बांगलादेश संघाशी घमासान रंगणार आहे. बांगलादेशला हरवून विजयाचे खाते उघडण्याच्या इराद्याने हिंदुस्थानी फुटबॉलपटू मैदानावर उतरण्यासाठी आतूर झाले आहेत.

फुटबॉलची पंढरी असलेल्या कोलकात्याच्या सॉल्ट लेक स्टेडियमवर सायंकाळी 7.30 वाजता ही लढत होणार आहे. सलामीच्या लढतीत ओमानकडून हार पत्करावी लागल्यानंतर हिंदुस्थानने बलाढय़ कतारला गोलशून्य बरोबरीत रोखून एका गुणाची कमाई केली. तब्बल नऊ वर्षांनंतर कोलकात्याच्या मैदानावर हिंदुस्थानच्या वरिष्ठ संघाची लढत होणार असल्याने फुटबॉलशौकिनांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. कर्णधार सुनील छेत्रीच्या पुनरागमनामुळे यजमान संघाचा आत्मविश्वास कमालीचा उंचावलेला आहे. ओमानविरुद्ध 1-2 गोलने पराभव स्वीकारावा लागलेल्या लढतीतही सुनील छेत्रीनेच एकमेव गोल केला होता. दुसरीकडे बांगलादेशचा संघ लागोपाठच्या दोन पराभवांनंतर हिंदुस्थानला भिडणार आहे. त्यांना अफगाणिस्तान व कतारकडून हार पत्करावी लागली. मात्र या दोन्ही लढतींत जॅमी डे याने बांगलादेशसाठी अनेक संधी निर्माण केल्या होत्या. पण त्याच्या संघसहकाऱयांना त्याचे गोलमध्ये रुपांतर करता आले नाही.

यजमानांचे पारडे जड

मंगळवारच्या लढतीत या घडीला तरी यजमान हिंदुस्थानचे पारडे जड आहे. उभय संघांमध्ये आतापर्यंत झालेल्या 28 लढतींमध्ये हिंदुस्थानने 15 विजय मिळवले असून केवळ दोन लढती गमावल्या आहेत. मात्र 2013च्या सॅफ चॅम्पियनशिपमध्ये व 2014च्या आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण लढतीत बांगलादेशने हिंदुस्थानला बरोबरीत रोखले होते. त्यामुळे उद्याच्या लढतीतही पाहुणा संघ या मागील दोन लढतींतून प्रेरणा घेऊन यजमानांशी झुंजावण्याच्या इराद्यानेच मैदानावर उतरेल, यात वादच नाही.

आपली प्रतिक्रिया द्या