भाजपच्या दोन गटांमध्ये राडा; मुरलीधर मोहोळांसमोरच भिडले

पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासमोरच भाजपचे दोन गट एकमेकांना भिडल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओमध्ये धनकवडी येथील शंकर महाराज मठ आणि मंदिराच्या बाहेर दोन गटातील कार्यकर्ते एकामेकांसमोर आल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी असलेले नितीन कदम यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. सदगुरू शंकर महाराज मठ येथे हाणामारीचा प्रकार घडल्याचा दावा नितीन कदम यांनी केला आहे. नितीन कदम यांनी पोस्टमध्ये लिहिले की, सदगुरू शंकर महाराज मठ अशी पवित्र जागा देखील भाजपच्या गुंडांनी सोडली नाही! तेथे देखील हाणामारीचा प्रकार… दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हेच भाजपचे गुंड लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पैसे वाटत होते. प्रश्न हा आहे की पोलीस आयुक्त कारवाईचे धाडस दाखवणार का? भाजपचे दोन गट मानपानावरून एकमेकांना भिडले असल्याचे बोलले जात आहे.