‘खुशी पार्क वन’चे कंत्राटदार, अभियंत्यांवर गुन्हा दाखल करा; शिवसेनेचे मिरज शहर पोलिसांना निवेदन

मिरजेच्या किल्ला भागातील ‘खुशी पार्क वन’ या सदनिकेचे बांधकाम कोसळून झालेल्या दुर्घटनेस या इमारतीचे कंत्राटदार, अभियंते आणि संबंधितांना दोषी धरून त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा व कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख पैलवान विशालसिंह राजपूत यांनी केली आहे.

मिरज शहरातील किल्ला भाग येथे सुरू असलेल्या ‘खुशी पार्क वन’ या अपार्टमेंटचे बांधकाम सुरू असताना भिंत कोसळून एक ठार, तर सहाजण गंभीर जखमी झाले असून, जखमी व्यक्ती आणि व मृत कुटुंबीयांच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभा आहे. त्यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे पै. राजपूत यांनी मिरज शहर पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

‘खुशी कन्स्ट्रक्शन’चे मालक कासीम मनेर व त्यांचे भागीदार, कंत्राटदार व त्यांना चुकीचे काम करण्यासाठी मदत करणाऱ्यांवर तत्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी शिवसेना जिल्हाप्रमुख पै. विशालसिंह राजपूत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पोलिसांना निवेदन दिले.

या निवेदनात म्हटले आहे की, येथे सुरू असलेल्या बांधकामास संबंधित विभागाची परवानगी आहे, हे तपासावे. तसेच साइटवरील ४० फूट खोल खोदून परवानगी नसताना मुरूम काढून त्याची विक्री केली आहे. त्यामुळे भिंत कोसळली. एका कामगाराला जीवाला मुकावे लागले, तर अनेक कामगार गंभीर जखमी झाले आहेत. यामुळे मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अन्यथा ‘शिवसेना स्टाइल’ने जनआंदोलन करू, असा इशारा दिला आहे.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख महादेव मगदूम, मिरज शहरप्रमुख महादेव हुलवान, सुरेश भोसले, कुबेरसिंह राजपूत, पांडुरंग लोहार, आनंद राजपूत, सरोजिनी माळी, शकिरा जामदार, स्नेहल माळी, बबन गायकवाड, अमितसिंह राजपूत, सूरज इसापुरे, गिरीश जाधव व शिवसैनिक उपस्थित होते.