सांडपाण्यावर भाज्या पिकवणाऱ्यांवर गुन्हे, महापौरांचे प्रशासनाला आदेश

549
railway-track-side-crops

सांडपाण्यावर पालेभाज्यांचे मळे फुलवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कारवाईचा नांगर फिरवण्याचे सक्त आदेश ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी पालिकेच्या आरोग्य विभागाला दिले आहेत. नाशिकची पालेभाजी असे म्हणत ठाण्याच्या बाजारात मोठय़ा प्रमाणात सांडपाण्यावर पिकवलेले पालक, मुळा, मेथी, चवळी, माठ विकली जात आहे. त्यामुळे ठाणेकरांचे आरोग्य धोक्यात आले असून कॅन्सरसारख्या आजाराचा धोका वाढला आहे. त्यामुळे हे पालेभाज्यांचे मळे रेल्वेच्या किंवा कोणत्याही प्राधिकरणाच्या हद्दीत असले तरी त्यावर महापालिका अधिनियमानुसार कारवाई करण्याचे आदेश महापौरांनी दिले आहेत.

मध्य रेल्वेच्या स्थानकांदरम्यान छोटे वाफे करून पालेभाज्या पिकवण्यात येतात. यात पालक, चवळी, भेंडी, लाल माठ, माठ आदी भाज्यांचा समावेश आहे. मात्र या पालेभाज्या पिकवण्यासाठी रेल्वे रुळांलगत असलेल्या गटारातील सांडपाण्याचा वापर करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच ठाणे महापालिका क्षेत्रातील समतानगर, गांधीनगर, सिडको, मफतलाल कंपाऊंड, कळवा, मुंब्रा व दिवा परिसरातील अनेक मोकळ्या भूखंडावर पिकवल्या जाणाऱया भाज्यांसाठी बोअरिंगच्या पाण्याऐवजी मलमूत्र मिश्रित सांडपाणी वापरले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. मानवी मलमूत्र हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे, असे असतानादेखील याच सांडपाण्यावर भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जात असून याच पाण्यामध्ये त्या धुऊन बाजारात विक्रीसाठी आणल्या जातात. शहराच्या नाक्या नाक्यावर किरकोळ विक्रेत्यांकडे मिळणाऱ्या या पालेभाज्यांमुळे पोटाचे, मेंदूचे विकार आणि कॅन्सरचा धोका वाढला आहे. यासंदर्भात तक्रारी वाढल्यानंतर महापौर नरेश म्हस्के यांनी तातडीने पालिका अधिकाऱयांची बैठक घेऊन आरोग्य विभागाला कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले.

प्रभागनिहाय चौकशी

पालेभाज्यांची लागवड होणाऱया ठिकाणांवर प्रत्यक्ष पाहणी करून चौकशी करण्याचे आदेश सर्व प्रभाग समित्यांच्या सहाय्यक आयुक्तांना देण्यात आले आहेत. तसेच सांडपाण्यावर पिकवलेल्या भाज्या विकणाऱयांवरही कारवाई करण्याच्या सूचना महापौर नरेश म्हस्के यांनी दिल्या आहेत. या बैठकीला उपमहापौर पल्लवी कदम, सभागृह नेते अशोक वैती, नगरसेविका मालती पाटील, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र अहिवर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध माळगावकर, प्रदूषण नियंत्रण अधिकारी मनीषा प्रधान तसेच सर्व प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त उपस्थित होते.

आरोग्याशी खेळणाऱयांची गय करणार नाही

नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे हे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून ठाणे महापालिकेचे पहिले कर्तव्या आहे. तसे अधिकारही महापालिकेला आहेत. त्यामुळे कारवाईचा हा बडगा उगारण्यात येत असून कुणाचीही गय केली जाणार नाही. तसेच याबाबत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही तक्रार केली असून रेल्वे प्रशासनाचे याकडे लक्ष वेधण्यास सांगितले असल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या