फिल्म फेअर पुरस्कार ‘फिक्स’! ‘गली बॉय’ला मिळालेल्या पुरस्कारांवर टीकेची झोड

1344

65वे फिल्म फेअर पुरस्कार शनिवारी रात्री जाहीर झाले. झोया अख्तर दिग्दर्शित गली बॉय या चित्रपटाने सर्वाधिक पुरस्कार मिळवत फिल्म फेअरवर आपली मोहोर उमटवली. पण, या घोषणेनंतर नेटकऱ्यांनी मात्र संपूर्ण पुरस्कार सोहळ्यावरच टीकेची झोड उठवली आहे. फिल्म फेअर पुरस्कार फिक्स असल्याची घणाघाती टीकाही नेटकऱ्यांनी केली आहे.

ट्विटरवर सध्या #BoycottFilmFare हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. अनेक नेटकऱ्यांनी 2019मध्ये प्रदर्शित झालेल्या केसरी, सुपर 30, मिशन मंगल, छिछोरे अशा वेगवेगळ्या चित्रपटांची पोस्टर शेअर करून नेटकरी हा हॅशटॅग वापरत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार 2019मध्ये अनेक चांगले चित्रपट प्रदर्शित झाले पण, या सर्वांकडे दुर्लक्ष करून फक्त गली बॉयचा विचार केला गेला. त्यामुळे फिल्म फेअर पुरस्कार सोहळे हे फिक्स असतात, असा आरोप नेटकऱ्यांकडून केला जात आहे.

नेटकऱ्यांचा बहुतांश रोष हा सर्वोत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री आणि गीत या तीन विभागांसाठी पाहायला मिळत आहे. अनेकांच्या म्हणण्यानुसार, सुपर 30 मधला हृतिकचा अभिनय अधिक उत्तम आहे. तसंच आलिया भटपेक्षा कंगना सारख्या अभिनेत्रींनी आपल्या भूमिका उत्तम निभावल्या आहेत. केसरीसारख्या चित्रपटातील तेरी मिट्टी हे गाणं लेखनाच्या दृष्टिने अधिक सुंदर होतं. मात्र, या गाण्याला डावलून फिल्म फेअरमध्ये अपना टाईम आयेगा या गाण्याला पुरस्कार मिळाला. त्यामुळे नेटकरी चिडले असून त्यांनी विविध मार्गांनी आपला राग व्यक्त केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या