मुख्यमंत्रीपदाच्या निर्णयासाठी राहुल गांधींकडे सगळ्यांचे लक्ष

14

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात काँग्रेसने सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांकडे दावा केला आहे. तसेच या राज्यात मुख्यमंत्री कोण असेल याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार एकमताने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे देण्यात आला आहे. त्यामुळे गुरुवारी याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. तर तेलंगणामध्ये सर्वाधिक 88 जागा जिंकलेल्या टीआरएसचे चंद्रशेखर राव गुरुवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

बुधवारी मध्य प्रदेश आणि राजस्थानात नवनिर्वाचित आमदारांची बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री ठरवण्याचे अधिकार राहुल गांधी यांना देण्यात आला आहे. मध्य प्रदेशमध्ये पक्षाचे नेते म्हणून ज्योतिरादित्य शिंदे यांनी कमलनाथ यांचे नाव सूचवले. त्याला सर्व आमदारांनी एकमताने पाठिंबा दिला. मात्र, अंतिम निर्णय राहुल गांधी घेणार आहे. या घडामोडींमुळे मध्य प्रदेशात कमलनाथ यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी अशोक गहलोत आणि सचिन पायलट प्रबळ दावेदार आहेत. त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी पक्षनेतृत्वाने त्यांना दिल्लीत बोलावले आहे. त्यांच्यासह राजस्थानचे पर्यवेक्षक के.सी. वेणुगोपालन आणि महासिचव अविनाश पांडे यांनाही दिल्लीत बोलावण्यात आले आहे. राजस्थानमध्ये काँग्रेस आमदारांची बैठक सुमारे चार तास सुरू होती. त्यात मुख्यमंत्री निवडण्याचे अधिकार राहुल यांना देण्यात आले आहे. पक्षनेतृत्वाचा निर्णय मान्य असेल असे सर्व आमदारांनी सांगितले आहे. तर छत्तीसगडमध्ये भूपेश बघेल आणि टी.एस. सिंहदेव मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार आहेत. मध्य प्रदेशचे पर्यवेक्षक ए. के. अॅण्टनी आणि छत्तीसगडचे प्रयवेक्षक मल्लीकार्जुन खरगे यांनी आमदारांची मते जाणून घेतली असून ती पक्षश्रेष्ठींना कळवण्यात येणार आहेत. त्यामुळे राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तिन्ही राज्यात मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय गुरुवारी होण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या