विरार रेल्वे स्थानकात शॉर्टसर्किटमुळे आग, मोठा अनर्थ टळला

फाईल फोटो

सामना प्रतिनिधी । विरार

पश्चिम रेल्वेवरील अंधेरी स्थानकात पुलाचा काही भाग कोसळल्याची घटना ताजी असतानाच विरार रेल्वे स्थानकाच्या फलाटावरील केबल्सना सायंकाळी अचानक शॉर्टसर्किटमुळे आग लागली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून फलाटाचा विद्युत पुरवठा तत्काळ बंद करण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.

विरार रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीन व चारवरील पत्र्याच्या शेडखालून नेण्यात आलेल्या केबल्सना संध्याकाळी ५.४५ वाजण्याच्या सुमारास शॉकसर्किटने आग लागली. सुरुवातीला छोटय़ा प्रमाणात स्पार्किंग होऊन अचानक केबलने पेट घेतल्यामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती. रेल्वे स्थानकावर उद्घोषणा करून तत्काळ फलाट रिकामा करण्यात आला. मात्र यावेळी फलाटावर संध्याकाळी सहा वाजता सुटणारी डहाणू-विरार लोकल दहा मिनिटे उशिराने सोडण्यात आली.

मीरारोडमध्ये रेल्वेचे बुकिंग ऑफिस पेटले

मीरारोड रेल्वे स्थानकाजवळ आज दुपारी पावणेबाराच्या सुमारास बुकिंग ऑफिसला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. सुदैवाने तेथे काम करीत असलेले मजूर पळून गेल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. बुकिंग ऑफिस उभारण्याचे काम तेथे सुरू असून सदर घटना समजताच अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.