मुंबईतील लोअर परळ भागात असणाऱ्या कमला मिल्समधील टाइम्स टॉवरला शुक्रवारी सकाळच्या सुमारास आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 9 गाड्या घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सदर आगीच्या घटनेमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
लोअर परळ पूर्व भागात कमला मिस्लमध्ये टाइम्स टॉवर ही 7 मजली इमारत आहे. शुक्रवारी सकाळी सहाच्या सुमारास या इमारतीला आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. इलेक्ट्रीक वायर आणि एसीमध्ये आग लागल्याने परिसरात धुराचे लोट उठले होते. याची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.
Mumbai fire – लोअर परळ भागातील कमला मिल्समधील टाइम्स टॉवरला आग, अग्निशमन दलाच्या 9 गाड्या घटनास्थळी pic.twitter.com/Q9VIjmfHpo
— Saamana (@SaamanaOnline) September 6, 2024
दरम्यान, याआधी 29 सप्टेंबर 2017 रोजी कमला मिल्समधील एका रेस्टॉरंटला आग लागली होती. या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला होता, तर 19 जण होरपळले होते. त्यांना सायन आणि केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
कमला मिल्समधील मोजोज बार अँड रेस्टॉरंटला ही आग लागली होती. काही मिनिटांमध्ये या आगीने रौद्ररुप धारण केल्याने मृतांचा आकडा वाढला होता. मृतांमध्ये बहुतांश महिलांचा समावेश होता. रेस्टॉरंटच्या छतावर आयोजित वाढदिवसाच्या पार्टीमध्ये सहभागी होण्यासाठी त्या आल्या होत्या. आग आणि धुरामुळे गुदमरून त्यांचा मृत्यू झाला होता.