समृद्धी महामार्गावर धावत्या आयशरला आग; मोठी दुर्घटना टळली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

समृद्धी महामार्गावरील मुंबई कॉरिडॉरमध्ये धावत्या आयशर ट्रकला अचानक आग लागल्याची घटना रविवारी (दि. 12) सकाळी घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून मोठा अनर्थ टळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर पोलीस केंद्रांतर्गत समृद्धी महामार्ग उपकेंद्र दुसरबीड, पोलीस स्टेशन बीबी हद्दीत चॅनल क्रमांक 312 वर सकाळी 08.21 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आयशर ट्रक क्रमांक UP-65-RT-2140 हा नाशिककडे जात असताना त्यातील बॅटरीमध्ये स्पार्किंग होऊन अचानक आग लागली.

घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप इंगळे यांच्यासह शेख नासिर,नाजीम चौधरी , श्रीकृष्ण दुणगु, गायकवाड,इंदल राजपूत (HC 1214, पोलीस कॉन्स्टेबल 71, 1914 व 2432) यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात यश आले.सकाळी ११ पर्यंत आग आटोक्यात आणली होती.

वाहन चालक रोहित कुमार (रा. गाजीपूर, उत्तर प्रदेश) याने दिलेल्या माहितीनुसार, बॅटरीतील स्पार्किंगमुळे आग लागली. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही.

दरम्यान, वाहन रस्त्याच्या कडेला उभे करून घटनास्थळी बॅरिकेटिंग करण्यात आले होते. त्यामुळे वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नाही आणि महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू ठेवण्यात आली. या घटनेमुळे काही काळ परिसरात खळबळ उडाली होती.