
सर्वत्र दिवाळी उत्साहात साजरी होत असताना मुंबई, ठाण्यात रविवारी आगडोंब उसळला. मुंबईत दोन तर ठाण्यात एका ठिकाणी आगी लागण्याच्या घटना घडल्या. मुंबईत दादर पश्चिमेकडील कामगार स्टेडियममध्ये, तर डोंगरी परिसरातील एका चाळीत आग लागली. ठाण्यात रहेजा गार्डन येथे 17 मजली टॉवरमध्ये आगीचा भडका उडाला. त्यामुळे प्रचंड घबराट व पळापळ झाली. मुंबईतील आगीत कसलीही जीवितहानी झाली नाही. ठाण्यात काही कुटुंबे इमारतीच्या वरच्या मजल्यांवर अडकून पडली असून त्यांची सुटका करण्याचे प्रयत्न रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
दादरमध्ये आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत वेळीच आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे जीवितहानी टळली. शिवसेना आमदार महेश सावंत यांनी घटनास्थळी धाव घेतली. कामगार स्टेडियम राज्य सरकारच्या अखत्यारीत आहे. येथे डेकोरेटरची मोनोपॉली असून जागेचा फुकट वापर केला जातो. येथे कुठलीही दुर्घटना होऊ नये याची खबरदारी घेण्याची जबाबदारी त्यांची होती, असे सावंत म्हणाले.
आग लागण्याची दुसरी घटना डोंगरी परिसरातील हाजी कासम चाळीत रात्री सवादहाच्या सुमारास घडली. यात काही दुकाने व झोपडय़ा जळून खाक झाल्या.
ठाण्यातील आगीत अनेकजण अडकले
वागळे इस्टेटमधील रहेजा गार्डन परिसरातील 17 मजली कार्लाय टॉवरला रविवारी रात्री भीषण आग लागली. इमारतीच्या आठव्या मजल्यावर लागलेली आग चौदाव्या मजल्यापर्यंत पसरली. आगीमुळे काही कुटुंबे वरच्या मजल्यांवर अडकली आहेत. त्यांच्या सुटकेचे प्रयत्न रात्री उशिरापर्यंत सुरू होते. आगीचे नेमके कारण कळू शकले नाही.


























































