
मुंबईतील गोरेगाव पूर्व परिसरात असलेल्या एका 45 मजली टोलेजंग इमारतीला आज सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. गोकुळधाम परिसरातील कृष्णावाटिका रोडवर स्थित असलेल्या ‘डीबी वूड’ या इमारतीच्या नवव्या मजल्यावरील एका फ्लॅटला ही आग लागली. सकाळी साडेनऊच्या सुमारास लागलेल्या या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, ही आग घराच्या बेडरूममध्ये लागली होती. आगीची तीव्रता इतकी होती की, त्यात घरातील विजेची वायरिंग, इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन आणि इतर घरगुती साहित्य जळून खाक झाले आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले.
खबरदारीचा उपाय म्हणून आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने इमारतीमधील रहिवाशांना तातडीने सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. अनेक रहिवाशांना इमारतीमधील रिफ्युज एरिया आणि टेरेसवर नेण्यात आले, ज्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांमुळे ही आग आता आटोक्यात आली असून, सुदैवाने या घटनेत कोणालाही इजा झालेली नाही. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

























































