
सामना ऑनलाईन । भिवंडी
भिवंडी शहरातील टेमघर परिसरात शनिवारी दुपारच्या सुमारास एका वडापावच्या गाडीला भीषण आग लागल्याने एकच गोंधळ उडाला. वडापावच्या गाडीवर सिलेंडरमध्ये गळती झाल्यामुळे सिलेंडरच्या रेग्युलेटरने अचानक पेट घेतला. या आगीत संपूर्ण वडापावची गाडी आणि एक स्कूटर जळून खाक झाली आहे. आग लागल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या वेळी काही नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही.
सुदैवाने पंधरा ते वीस मिनिटांनी सिलिंडर मधील गॅस संपल्याने आग विझली. अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचण्या अगोदर आग विझल्याने नागरिकांचा जीव भांड्यात पडला, मात्र सिलेंडरचा स्फोट झाला असता तर मोठ्या प्रमाणात जीवीत हानी झाली असती अशी भीती नागरीकांनी व्यक्त केली.



























































